आतापर्यंत दीडशे कारखान्यांना गाळप परवाने

पुणे : २०२२-२३ चा ऊस गळीत हंगाम जोमाने सुरू झाला असून, आतापर्यंत सुमारे दीडशे साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने गाळप परवाने दिले आहेत, अशी माहिती साखर संकुलातील सूत्रांनी ‘sugartoday’ न्यूज मॅगेझीनला दिली.
या गळीत हंगामासाठी सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केले होते. परंतु त्यापैकी दीडशे कारखानेच आतापर्यंत परवाने मिळवू शकले आहेत. यामध्ये सहकारी आणि खासगी अशा दोन्ही साखर कारखान्यांचा समावेश आहे.
उर्वरित ५० साखर कारखान्यांना गाळप परवाने न मिळण्यामागे विविध कारणे असली, तरी एफआरपी निर्धारित वेळेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न देणे, एफआरपीची मोठी रक्कम थकवणे, नव्या हंगामासाठी एफआरपीबाबत .भूमिका निश्चित नसणे ही प्रमुख कारणे असल्याचे समजते. या कारखान्यांमध्ये सहकारी कारखान्यांसोबत काही खासगी साखर कारखान्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
यंदाचा हंगाम सुरू होऊन सुमारे महिन्याचा कालावधी लोटला आहे. यंदा लांबलेल्या पावसाने आधीच हंगामाला उशीर झाला आहे. त्यात काही कारखान्यांना गाळप परवानेच न मिळाल्याने एकंदरित गाळप हंगाम लांबण्याची शक्यता दिसत आहे.
शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीची संपूर्ण रक्कम दिल्याखेरीज यंदा गाळप परवाने द्यायचे नाहीत, अशी कडक भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतल्यामुळे थकबाकीदार साखर कारखान्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच दोनशे कारखान्यांनी अर्ज दाखल करूनही दीडशेवर साखर कारखानेच यंदा गाळप परवान्यांसाठी पात्र ठरले आहेत.