मिरजमध्ये साखर उद्योगाला २५ लाखांचा फटका

संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
मिरज : मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास ऊसतोड मजूर आणि वाहतूक यंत्रणा पुरवण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कारखान्याचे शेती अधिकारी परशुराम आनंदा चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, ७ जुलै २०२५ पासून आजपर्यंत हा प्रकार घडल्याचे नमूद केले आहे.
फिर्यादीनुसार, संशयितांनी मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन कारखान्याकडून मोठी रक्कम घेतली. मात्र प्रत्यक्षात मजूर पुरवठा न करता त्यांनी कारखान्याची फसवणूक केली.
या प्रकरणी रंगनाथ ज्ञानोबा आंधळे, राधाबाई रंगनाथ आंधळे, विकास बारीकराव सारूक (आंधळेवाडी, ता. केज, जि. बीड), बाबूराव मधुकर ठोंबरे (धोतरा सरणी, सांगवी, ता. केज) आणि बाबू राजाराम हांगे (रामेश्वरवाडी, ता. केज, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, या फसवणुकीमागील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी चौकशी सुरू आहे.






