दहा टक्के वेतनवाढ जाहीर, मात्र साखर कामगारांमध्ये नाराजी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : महाराष्ट्रातील साखर कामगारांना दहा टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा मुंबईत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केली; मात्र वेतनवाढ अपुरी असल्याची भावना काही कामगारांनी बोलून दाखवली, किमान १५ टक्के वेतनवाढ अपेक्षित होती, अशा भावना अनेकांनी मांडल्या.

साखर कामगारांच्या प्रलंबित वेतनवाढीच्या मुद्यावर पुण्यात झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत कसलाच तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे ज्येष्ठ नेते पवार यांच्या लवादाकडे याबाबतचा निर्णय सोपवण्याचा एकमुखी ठराव झाला. ते येतील तो निर्णय मान्य करण्याचे यावेळी ठरले. त्यानुसार पवार यांच्या लवादाने मुंबईत दहा टक्के वेतनवाढीचा निर्णय जाहीर केला, तर हा निर्णय १६ महिन्यांपासून प्रलंबित राहिल्याने एवढ्या कालावधीचा फरक देण्यात यावा, अशी सूचनाही पवार यांनी केली आहे.

यासंदर्भात त्रिपक्षीय समितीची पुण्यात २३ जुलै रोजी बैठक होऊन, पवार लवादाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे, असे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सचिव राजेंद्र तावरे यांनी म्हटले आहे.

कामगारांचा अपेक्षाभंग

यावेळी किमान १५ टक्के पगारवाढ नक्की मिळेल, अशी अपेक्षा साखर कामगारांना होती. तशी मागणी गेल्या दीड वर्षापासून लावून धरण्यात आली होती. मात्र त्यांना आता दहा टक्के पगारवाढीवर समाधान मानावे लागणार आहे. कारण पवार लवाद एकमताने मान्य केला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पगारवाढीचे प्रमाण कमी केले जात आहे. ते १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आले आणि आता १० टक्क्यांवर आले आहे. साखर कामगारांना कोणी वाली राहिला नाही, आधीच या उद्योगात सर्वात कमी वेतन आहे आणि त्यातदेखील वेतनवाढीबाबत हा आखडता घेतला जातो, अशा  प्रतिक्रिया कामगारांमध्ये उमटल्या आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »