साखर कामगार १६ डिसेंबरपासून संपावर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : साखर उद्योगातील कामगारानी १६ डिसेंबर पासून विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक सांगली येथे झाली. कामगारांच्या विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप १६ डिसेंबर रोजीच्या पहाट पाळीपासुन साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगार बेमुदत संपाच्या निर्णयाप्रमाणे राज्यातील सर्व साखर कामगार पुढील मागण्यासाठी संपावर जातील, असा इशारा राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे अध्यक्ष पी. के. मुडे, सरचिटणीस आनंदराव वायकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

या बैठकीत खालील प्रमुख मागण्या मांडल्या.

  • साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांचे वेतन व सेवाशर्ती ठरविणेबाबत शासनाने ताबडतोब त्रिपक्ष कमिटी गठीत करावी.
  • साखर उद्योगातील कामगारांचे थकीत वेतन मिळालेच पाहिजे.
  • साखर उद्योगातील रोजदारी, कंत्राटी, नैमित्तीक व तात्पुरते काम करणाऱ्या कामगारांनाही त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे अंमलबजावणी करून वेतनवाढ समान कामाला समान वेतन मिळावे.
  • भाडेतत्वावर व भागीदारीने व विक्री केलेल्या तसेच खाजगी साखर कारखान्यातील कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे व त्यांच्या थकीत पगाराची रक्कम अग्रकमाने मिळाली पाहिजे
  • याबाबत स्थानिक संघटनाची मान्यता घेवुनच करार करावा.
  • या व इतर दि. १०/०२/ २०२४ रोजीच्या कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात.
  • तसेच शेती महामंडळातील कामगांराचे प्रलंबित प्रश्नाची सोडवणुक करावी.


याबाबत दोन्ही राज्यव्यापी संघटनानी शासनास संपाच्या नोटीस दिलेल्या आहेत.
सरकारला देण्यात आलेल्या निवेदनावर महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस आनंदराव वायकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »