साखर उद्योगाचा गाळप हंगाम सरासरी ११० दिवस; आव्हाने कायम!

मुंबई : यंदाचा ऊस गाळप हंगाम सरासरी फक्त ११० दिवस चालला असला तरी साखर उद्योगासमोरील आर्थिक संकट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर आयुक्तालयाने २४ मार्चपर्यंतची आकडेवारी जाहीर केली असून, राज्यात आतापर्यंत ९८.८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
गेल्या वर्षी ८० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते. यंदा उत्पादनात वाढ झाली असली तरी सरासरीच्या तुलनेत ही वाढ कमी असल्याने उद्योगातील ताण कमी झालेला नाही. राज्यातील २१० पैकी १८३ कारखान्यांचे गाळप संपले असून, आणखी २३ कारखाने पुढील १५ दिवसांत बंद होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक ९८.८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात ८१.५० लाख टन तर कर्नाटकमध्ये ४५.८० लाख टन उत्पादन झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हंगाम वाढला, पण संकट कायम
गेल्या वर्षी गाळप हंगाम सरासरी ८३ दिवसांचा होता. यंदा तो ११० दिवसांपर्यंत वाढला असला तरी कोणताही कारखाना किमान १४० ते १५० दिवस चालला तरच त्याचे अर्थकारण टिकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, इतर पिकांना किफायशीर भाव न मिळाल्याने मराठवाड्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, त्याचा परिणाम संपूर्ण साखर उद्योगावर होऊ शकतो.






