साखरेची एमएसपी ३७२० करण्यासाठी पाठपुरावा : सहकारमंत्री

मुंबई : इथेनॉलचे दर प्रति लिटर (ज्यूस टू इथेनॉल) ६५ वरून ७० रुपये करणे आणि साखरेचा किमान विक्री दर क्विंटलला ३१०० रुपयांवरून ३७२० रुपये करण्याबाबत केंद्र सरकारला राज्याच्या वतीने निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साखर उद्योगाच्या बैठकीत दिली.
तसेच राज्याचे इथेनॉल धोरण तयार करण्यासाठीही सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथील साखर भवन येथे झालेल्या या बैठकीस साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश सोळुंके, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, विस्माचे महासचिव डॉ. पांडुरंगराव राऊत, व्यवस्थापकीय संचालक अजित चौगुले, आमदार हरिभाऊ बागडे, माधवराव घाटगे, महेश देशमुख, यशोवर्धन डहाके, रोहित नारा आदी उपस्थित होते.
विस्माकडून करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये खासगी कारखान्यांना मागील ४ वर्षांचे सॉफ्ट लोन योजनेनुसार व्याज अनुदान मिळावे. २६ खासगी साखर कारखान्यांचे राज्य सरकारकडे २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या कालावधीतील ४८५ कोटी रुपये अप्राप्त आहेत. ही रक्कम सहकारी साखर कारखान्यांबरोबरच सर्वांना वितरित करण्यात यावी. हंगाम २०१०-११ मध्ये कार्यक्षेत्रावरील दूर अंतरावरचा ऊस आणल्याने वाहतूक व साखर उतारा घट अनुदानाची ८ खासगी कारखान्यांची ८ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी मिळावी आदींचा समावेश होता.