डिसेंबरमध्ये साखरेचे दर स्थिरच राहणार ; साखर कोटा जाहीर

पुणे : केंद्र सरकार दर महिन्याला देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा जाहीर करत असते. नुकताच केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यासाठीचा २२ लाख टन साखर कोटा जाहीर केला आहे. त्यानुसार ही २२ लाख टन साखर कारखान्यांना विक्री करता येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या कोट्यापेक्षा हा कोटा २ लाख टन अधिक आहे. म्हणजेच सरकारने नोव्हेंबर महिन्यासाठी साखर विक्रीसाठी २० लाख टन कोटा दिला होता. दरम्यान, संक्रांतीच्या तोंडावर साखरेची मागणी वाढणार असली तरी यंदा गेल्यावर्षीपेक्षा साखरेचे उत्पादन थोडे अधिक होणार असल्याने दरावर फारसा परिणाम होणार नसल्याचा अंदाज साखर उद्योग क्षेत्रातील काही जाणकारांचे व्यक्त केला आहे.
सध्या राज्यातील बहुतांश साखर कारखान्याचा गाळप हंगाम वेगाने सुरू आहे. त्यामुळे नवीन साखरदेखील जास्त प्रमाणात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर विक्रीचा कोटा जरी वाढवला तरी त्याचा दरावर फारसा परिणाम होणार नाही, असे साखर तज्ज्ञांची मते आहेत. गेल्यावर्षी देखील डिसेंबर महिन्यासाठी २२ लाख टन एवढाच विक्रीसाठी साठा जाहीर केला होता. मागील वर्षीएवढाच हा कोटा असल्याने घाऊक बाजारात साखरेच्या दरात फारशी चढ-उतार होईल, असे सध्या तरी वाटत नाही. नोव्हेंबर महिन्यामधील बहुतांशी साखरेची विक्री झाली आहे. डिसेंबरच्या कोट्यात गेल्यावर्षीपेक्षा वाढ केल्याचे दिसत नाही.






