साखर क्षेत्रासाठी -व्हीजन 2047- : आयुक्त सिद्धराम सालिमठ

पुणे : महाराष्ट्राच्या साखर क्षेत्रासाठी ‘व्हीजन २०४७’ तयार करण्याचा विडा साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी उचलला आहे. उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने हा एक सविस्तर दस्तऐवज असेल.
महाराष्ट्रातील साखर क्षेत्राकरिता आम्ही ‘व्हीजन २०४७’ तयार करत आहोत. ऊस उत्पादकता वाढवणे आणि उपपदार्थांची मूल्यवृद्धी करणे यावर या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये विशेष भर राहणार आहे, असे आयुक्त सालिमठ यांनी सांगितले. साखर क्षेत्रातील संबंधित घटकांनी यावर आपले सादरीकरण पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

याच अनुषंगाने शुक्रवारी साखर आयुक्त कार्यालयामध्ये तज्ज्ञांकडून सादरीकरण करण्यात आले. यावेळी साखर आयुक्त सालिमठ यांच्यासोबतच, प्राज उद्योगाचे तुषार पाटील, ‘आयएफजीई’चे दिलीप पाटील, राज प्रोसेसच्या भाग्यश्री घोंगडे, साखर आयुक्तालयातील संचालक, सहसंचालक, तसेच व्हीएसआयचे प्रतिनिधी उपस्थित होते.