अर्थसंकल्प : एमएसपी, इथेनॉलच्या आशेवर साखर शेअरची वाटचाल
केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये एमएसपी, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध, साखर निर्यातबंदी आदींवर सकारात्मक निर्णय होतील, अशी आशा देशातील साखर उद्योगाला आहे. त्यामुळे साखर उद्योगाच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये सध्या समाधानकारक वाटचाल सुरू आहे. मात्र एलारा सिक्युरिटीजच्या मते, आर्थिक वर्ष २५ साठी साखर उद्योगाचा लघुकालिक अंदाज सर्वसाधारणच राहील. कारण एकूण महसूल मर्यादितच राहणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या धामधुमीत बहुतांश साखरेचे शेअर वधारले आहेत. केसीपी शुगर, श्री रेणुका शुगर्स, बलरामपूर चिनी, राणा शुगर्स, बजाज हिंदुस्थान शुगर, ईआयडी पॅरी, त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज आणि पोन्नी शुगर्स (इरोड) या कंपन्यांच्या शेअर्स दरांमध्ये गेल्या एका महिन्यात 2 ते 18 टक्क्यांच्या दरम्यान वाढ झाली आहे. मात्र याच कालावधीत उगार शुगर आणि सिंभोली शुगर्स अनुक्रमे 3 आणि 4.5 टक्क्यांनी घसरले. मवाना, श्री रेणुका, इतर समभाग दर FY25 साठी एमएसपी वाढीच्या आशेवर 13% पर्यंत वाढले.
साखरेसाठी प्रारंभिक एमएसपी, 2018 मध्ये 29 रुपये प्रति किलो होता आणि 2019 मध्ये तो वाढवून 31 रुपये प्रति किलो केला गेला होता, गेल्या पाच वर्षांत त्यात काहीही वाढ झालेली नाही. असे असले तरी सध्याचे खुल्या बाजारातील साखरेचे दर ३६ ते ३९ रुपये प्रति किलो आहेत. या पार्श्वभूमीवर एमएसपी वाढ अपरिहार्य आहे. त्यामुळे एक आधाररेषा निश्चित होईल, असे साखर उद्योगाला वाटते. मात्र आगामी पाच-सहा महिने यात बदल होण्याची शक्यता नाही, असा अंदाज एलाराने वर्तवला आहे.