एमएसपी, इथेनॉल दर वाढीच्या आशेने साखर शेअर वधारले
मुंबई : इथेनॉल दर आणि साखरेच्या ‘एमएसपी’मध्ये वाढीचे संकेत केंद्र सरकारने दिल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात साखर उद्योगातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. श्री रेणुका शुगर्स, बलरामपूर चिनी यांना तेजीचा सर्वाधिक फायदा मिळाला.
साखरेची एमएसपी वाढवावी, इथेनॉल दरांमध्येही वाढ करावी आणि साखर निर्यातीस परवानगी द्यावी इ. मागण्यांचा पाठपुरावा साखर उद्योग करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सूचित केले की सरकार 2024-25 हंगामासाठी इथेनॉलच्या किमती वाढविण्याचा विचार करत आहे, तसेच त्याच कालावधीसाठी साखरेची किमान विक्री किंमत आणि साखर निर्यातीच्या धोरणाचा फेरआढावा घेणार आहे.
या आश्वासनाचा शेअर बाजारावर चांगला परिणाम दिसून आला. शुक्रवारी, 27 सप्टेंबर रोजी साखरेच्या समभागात इंट्राडे ट्रेडिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली.
जोशी यांनी इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) आयोजित इंडिया शुगर अँड बायो-एनर्जी कॉन्फरन्सच्या वेळी पत्रकारांना सांगितले की, ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2024-25 हंगामातील साखर उत्पादनाबाबत आम्ही आशावादी आहोत.
या घडामोडीनंतर, सत्रादरम्यान अनेक साखर समभागांमध्ये लक्षणीय वाढ झाली, श्री रेणुका शुगर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर राहिले, त्यानंतर बलरामपूर चिनी मिल्स आणि बजाज हिंदुस्थान शुगर 6% वाढले. मवाना शुगर्स 5.6% वधारला, तर केएम शुगर मिल्स 5% वाढला.
याव्यतिरिक्त अवध शुगर अँड एनर्जी, दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज, मगध शुगर अँड एनर्जी, राजश्री शुगर्स अँड केमिकल्स, द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज, सिंभोली शुगर्स, केसीपी शुगर अँड इंडस्ट्रीज, धामपूर शुगर मिल्स, शक्ती शुगर आणि उगार शुगरच्या शेअर्स दरात 4% ते 5% टक्क्यांची वाढ झाली.
सध्या, उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ₹65.61 प्रति लीटर आहे, तर B-हेवी आणि C-हेवी मोलॅसेसपासून तयार केलेल्या इथेनॉलचा दर अनुक्रमे ₹60.73 आणि ₹56.28 प्रति लिटर आहे. साखरेची एमएसपी २०१९ पासून रू. ३१ एवढीच आहे.
सरकार वरील मागण्यांच्या दिशेने सकारात्मक पावले टाकेल, अशी आशा आहे. कारण 16 सप्टेंबर रोजी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (DFPD) साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसेसपासून रेक्टिफाइड स्पिरिट (RS) आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ENA) तयार करण्यास पुन्हा परवानगी दिली.
ऑगस्टच्या उत्तरार्धात, सरकारने 2024-25 इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) मध्ये इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस, साखर सिरप आणि बी- हेवी मोलासेसच्या वापरावरील पूर्वीचे निर्बंध उठवले आहेत.