हार्वेस्टर यंत्र बहुपयोगी बनवा : शुगर टास्क फोर्सची सूचना

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ऊसतोड मजुरांच्या कोयता मुक्तीचा विचार कराः डॉ. सोमिनाथ घोळवे

पुणे : शुगर टास्क फोर्स कोअर कमिटी तर्फे पुण्यामध्ये “ऊस तोड कामगार, ऊस वाहतूक, यांत्रिक तोडणी- समस्या व निवारण” ह्या विषयावर चर्चा मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती.

देशातील ही एकमेव समिती आहे जी ऊस उत्पादक शेतकरी, कारखाने, कर्मचारी, ऊस तोड कामगार, ठिबक, मशीनरी सप्लायर्स अश्या सर्वांचा (स्टेक होल्डर्स) संतुलित विचार करून वाटचाल करीत आहे.

ह्या बैठकीला साखर उद्योगातील संबंधित तज्ञ, कार्यकारी संचालक, शेतकरी अभ्यासक नेते, ऊस शास्त्रज्ञ, ऊस तोड कामगार नेत्यांनी चर्चेत सहभाग घेऊन आपली बाजू मांडली.

बैठकीच्या सुरूवातीला श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दत्ताराम रासकर यांनी शुगर टास्क फोर्सच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगून, आतापर्यंत केलेल्या कामाचा संक्षिप्त आढावा घेतला.

प्रास्ताविक करताना श्री. सतीश देशमुख (अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स व शुगर टास्क फोर्स कोअर कमिटीचे निमंत्रक) यांनी सांगितले की एक मशीन हार्वेस्टर मुळे 200 ऊस तोड कामगाराचा रोजगार हिरावून घेतला जातो. पण कुठल्याही नवीन आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध असू नये. ग्रामीण भागात कृषी प्रक्रिया उद्योग निर्मिती करून पर्यायी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. एका बाजूला मुकादमाचा ऍडव्हान्स चुकता करायचा व दुसरीकडे गावाकडे सावकाराच्या कर्जाचा तगादा या चक्रात कामगार अडकला आहे.

ऊस तोडणी मजुरांचे अभ्यासक श्री. सोमीनाथ घोळवे यांनी प्रत्यक्ष फील्ड रिसर्चच्या आधारावर मजुरांच्या व्यथा, सामाजिक प्रश्न मांडले. मजुरांना आपण किती सवलती देतो, याची आकडेवारी सादर केली जाते, मात्र कोयता मुक्ती झाल्याशिवाय त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही, त्यामुळे यावर विचार व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. आपण स्वत: ऊसतोड मजुराच्या परिवारातून आलो आहोत, माझे लहानपण उसाच्या फडात गेले आहे, असे नमूद करून त्यांनी ऊसतोड मजुरांच्या समस्यांची शास्त्रशुद्धपणे मांडणी केली.

ऊस तोड यंत्र उत्पादक कंपनी एस. बी. रिशेलर्स चे प्रतिनिधी श्री. महेश सूळ यांनी महाराष्ट्रातील ऊसतोड यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियाचा आढावा घेऊन त्याचे फायदे व तोटे सांगितले. छोट्या मशीनची मागणी असताना सुद्धा त्याच्या मर्यादा सांगितल्या. मशीन मध्ये काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या करण्याचे मान्य केले.

हार्वेस्टर उत्पादकांनीच ऊसतोडणी करावी : गायकवाड

कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. दीपक गायकवाड यांनी ऑपरेटिंग लॉसेस व मध्यस्थी एजन्टस्‌ कमी करण्यासाठी ‘कटिंग इंडस्ट्री’ ही नवी संकल्पना मांडली व यंत्र उत्पादक कंपनीने ‘काँट्रॅक्टिंग कंपनी’ म्हणून काम करावे असे सुचविले. याअंतर्गत ऊसतोडणीची जबाबदारी या कंपन्यांनी एकत्रितपणे घ्यावी, देशासमोर एक नवे मॉडेल उभे करावे, असे ते म्हणाले.

तंत्रज्ञानाला विरोध नाही : थोरे

ऊसतोड कामगार, मुकादम युनियनचे अध्यक्ष श्री. गहिनीनाथ थोरे पाटील यांनी आज पर्यंत दिलेले लढे, उपोषण, मागण्या मान्य झालेले यश ह्याचा आढावा घेतला व राहिलेल्या त्रुटी सांगितल्या. तसेच प्राप्त परिस्थितीचा विचार करून यंत्रांद्वारे ऊस तोडणीचा पर्याय स्वाकारण्यास संमती दर्शविली.

ऊसवाहतूक खर्च अंतरानुसार हवा

या वेळी शेतकरी अभ्यासक प्रतिनिधी श्री. रावसाहेब ऐतवडे यांनी ऊसतोडणी यंत्रा मधील काही त्रुटींची माहिती दिली व त्या दूर करण्याचे आवाहन केले. आंदोलन अंकुश संघटनेचे श्री. दीपक पाटील यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षात एफआरपी मध्ये नगण्य वाढ झाली आहे. उलट ऊस तोडणी, वाहतूक वजावटी मध्ये जास्त वाढ झाली आहे. त्याची आकारणी खर्चाची सरासरी प्रमाणे न करता अंतरानुसार, टप्पा निहाय करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

श्री. तात्यासाहेब निकम ( माजी कार्यकारी संचालक) यांनी कारखान्यांमधील ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा व मजूर भरती बाबत विवेचन केले. इन्स्टिट्यूट ऑफ शुगर टेक्नॉलॉजीचे संस्थापक-अध्यक्ष श्री. अतुल माने पाटील यांनी ऊस विकास कार्यक्रम राबविण्या बाबत कारखान्यांनी प्रयत्न करावेत असे सांगितले. तर अनंत निकम यांनी ऊस क्षेत्र विकास व ऊत्पादकता वाढविणे गरजेचे आहे असे नमूद केले.

वरिष्ठ पत्रकार आणि ‘शुगरटुडे’चे संपादक श्री. नंदकुमार सुतार यांनी या यंत्राचा वापर फक्त ऊसतोडणी पुरता न होता अन्य काही कामासाठी ते उपयोगात येईल असा बदल कंपनीने त्या मध्ये करावा. जेणे करून कारखाने बंद झाल्या नंतर देखील त्याचे काम चालू  राहील व व्याजाचा बोजा खरेदीदारावर येणार नाही, अशी सूचना केली. एका यंत्रावर कोटी-सव्वा कोटी गुंतवणूक करून त्याचा उपयोग केवळ दोन-तीन महिन्यांसाठी असेल, तर फारसा उपयोग नाही. यावर मशीन उत्पादकांनी विचार करावा आणि हार्वेस्टरला ट्रॅक्टरप्रमाणे बहुपयोगी बनवावे, तरच हे तंत्र पूर्णपणे यशस्वी होईल, असेही ते म्हणाले.

उपस्थित सर्व सदस्यांनी या सूचनेला सहमती व्यक्त केली.  

डीएसटीए कार्यकारिणी सदस्य आणि कृषी तज्ज्ञ डॉ. दशरथ ठवाळ यांनी गुजरात मधील साखर उतारा कमी असण्याचे कारण जळीत ऊस असून ते लोन महाराष्ट्रात येऊ देऊ नका, असे आवाहन केले. सर्व कारखान्यांनी व्यावसायिक व्यवस्थापन ठेवणे गरजेचे आहे, असे सरव्यवस्थापक श्री. रोहिदास यादव यांनी म्हटले. नवदीप सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. साहेबराव खामकर यांनी बैठकीचा गोषवारा सांगून उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीस सरव्यवस्थापक श्री. भारत तावरे, शेतकरी अभ्यासक सीमा नरोडे, कारखाना कर्मचारी प्रतिनिधी श्री. दिलीप वारे, श्री. बाळ भिंगारकर, श्री. राहुल  माने, श्री. संतोष पांगरकर, श्री. सुनील साळवे उपस्थित होते.

टास्क फोर्सच्या  या बैठकीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, चाळीसगाव, अहिल्यानगर वरून प्रतिनिधी उपस्थित होते.

समारोप करताना श्री. सतीश देशमुख यांनी सांगितले, की साखरेला द्विस्तरीय (औद्योगिक व घरगुती) भाव देण्याच्या आपल्या सूचनेचा पाठपुरावा करण्यासाठी आपले शिष्टमंडळ श्री. मुरलीधर मोहोळ (केंद्रीय सहकार राज्यमंत्री) यांची पुढील आठवड्यात भेट घेणार आहे. तसेच ज्या गुजरात साखर कारखान्याने जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती कडे (बायो सीएनजी, हायड्रोजन, कार्बन डाय ऑक्साईड, झिरो वेस्ट) प्रगती केली असेल तिथे अभ्यास समिती भेट देईल.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक राजकुमार धुरगुडे पाटील यांच्या संकुलात बैठक पार पडली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »