साखर कामगारांचा १६ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा
सांगली : वेतन वाढीसह विविध मागण्यासाठी राज्यातील साखर कामगार येत्या १६ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाची सांगली येथील साखर कामगार भवन येथे नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी संपाचा इशारा देण्यात आला.
या बैठकीसाठी अहिल्यानगर मुळा कारखान्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील साखर कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. बैठकीत वेतन वाढीसह अन्य मागण्यासाठी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा साखर कामगारांनी दिला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकराव भोसले, कार्याध्यक्ष राऊ शंकर पाटील, महासंघाचे सरचिटणीस आनंद वायकर यांनी दिली.
यावेळी काळे म्हणाले, वेतन वाढ, थकीत वेतन आणि किमान वेतन, या प्रमुख तीन आणि अन्य ३५ मागण्या सातत्याने सरकारकडे मांडण्यात आल्या आहेत. मात्र साखर कामगाराच्या प्रश्नाकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे आता राज्यातील साखर कामगारांनी आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सांगलीत बैठक घेतली. या बैठकीत साखर कामगारांचे प्रश्न न सुटल्यास कामगार सरकारला येणाऱ्या निवडणूकीत हिसका दाखवतील, असा इशारा देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महासंघ या साखर कामगारांच्या मध्यवर्ती संघटनेने राज्यातील साखर कामगाराच्या पगार वाढीसाठी त्रिपक्ष कमिटी गठित करण्याबाबत शासनाला लेखी पत्र देऊनही कमिटी गठीत न केल्यामुळे राज्यातील साखर कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. राज्यातील साखर कामगाराच्या पगारवाढीच्या कराराची मुदत (दि. ३१) मार्च रोजी संपलेली आहे.
मंडळाच्या वतीने पगारवाढीच्या करारावाबत मागण्याचा मसुदा शासनाकडे (दि.२७) फेब्रुवारी रोजी सादर केला मात्र, याबाबत शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्याचप्रमाणे (दि.७) ऑगस्ट रोजी राज्यातील साखर कामगाराच्या पगारवाढीबाबत साखर आयुक्त पुणे कार्यालयावर राज्यातील ४० ते ५० हजार साखर कामगाराचा मोर्चा काढूनही शासनाने याची गंभीर दखल न घेता राज्यातील साखर कामगारावर अन्याय केला असल्याची भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष आनंद वायकर, सरचिटणीस डी.एम. निमसे, सल्लागार अविनाश आपटे, कोषाध्यक्ष अशोकराव पवार, प्रतिनिधी मंडळाचे कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, नितीन बेनकर, अशोक बिराजदार, प्रदीप शिंदे, सचिव नबाजी कदम, राजेंद्र तावरे, संजय मोरबाळे, संजय पाटील, योगेश हबीर, अहिल्यानगर जिल्हा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष नितीन गुरसळ, उपाध्यक्ष ज्ञानदेव आहेर व रवी तांबे, शेषनारायण मस्के, अशोकराव आरगडे, एकनाथ जगताप, रावसाहेब मगर, मच्छिद्र केळकर, सुभाष सोनवणे, अर्जुन दुशिंग, मनोहर शिंदे, कारभारी लोढे, आदिनाथ शेटे, शिवाजी कोठवळ, शिवाजी औटी, सत्यवान शिखरे, विलास वैद्य, शरद नेहे, वेणुनाथ बोळींज, गणपत दवंगे, अशोक पारखे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने साखर कामगार उपस्थित होते.