बेळगाव जिल्ह्यात यंदाही ऊसपीक आघाडीवर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कृषी खात्याकडून पिकांचे उद्दिष्ट जाहीर

बेळगाव : जिल्ह्यामधील यावर्षीही सर्वाधिक एकूण २ लाख ७२ हजार हेक्टरमध्ये ऊस पिक घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी सहसंचालक शिवणगौडा पाटील यांनी दिली आहे. कृषी खात्याकडून दरवर्षी खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांचे उद्दिष्ट नुकतेच जाहीर केले. यात ऊस पीक आघाडीवर आहे. त्याखालोखाल जोंधळा व सोयाबीन पीक घेण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या सर्व पिकांच्या बियाण्यांचा मुबलक साठा असून तो वेळेत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी शिवणगौडा पाटील यांनी दिली.

कृषी खात्यातर्फे दरवर्षी खरीप व रब्बी पिकांचे उद्दिष्ट जाहीर केले यासाठी आराखडा तयार केला जातो. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामातील पिकांची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. सर्व तालुक्यांतील विविध पिकांचे संभाव्य लागवड क्षेत्र जाहीर जाते.  

लागवड क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर जोंधळा असून, एकूण १ लाख ४१ हजार १५६ हेक्टरमध्ये पीक घेण्यात येणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर सोयाबीन असून ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर त्याची लागवड होणार आहे. याशिवाय भात ६३ हजार हेक्टर, मूग ४० हजार हेक्टर, कापूस ३७,४०० हेक्टर, भुईमूग १९ हजार हेक्टर, तूर १५ हजार हेक्टर, उडीद ११ हजार हेक्टर व अन्य ३२,४३० हेक्टर असे लागवड क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. या हंगामात पाऊस चांगला व वेळेवर झाला तर उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. दरम्यान, यावेळी या पिकांसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून वेळेत पेरणी करण्याची सूचनाही यावेळी कृषी सहसंचालक शिवणगौडा पाटील यांनी दिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »