ऊस लागण हंगाम, लागण पद्धती आणि प्रकार
–डॉ. जे. पी. पाटील
महाराष्ट्रात ऊस लागवडीस अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. पण सध्या महाराष्ट्रातील उसाचे सरासरी उत्पादन कमी होत चालले आहे. त्याची कारणे अनेक आहेत. ऊस लागवडीचे आधुनिक तंत्र समजावून घेऊन त्याप्रमाणे ऊसाची जोपासना केली, तर ऊसाचे किफायतशीर उत्पादन मिळते. पूर्व मशागत, बेणे, पाणी व्यवस्थापन, खतांचा वापर हे जसे महत्त्वाचे आहे. तसेच योग्य हंगामातील लागण आणि आधुनिक लागवड पद्धतीचा संयुक्तपणे तंत्रशुद्ध वापर या बाबी ही अतिशय महत्त्वाच्या आहेत.
महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यात ऊस लागणीचा एकच हंगाम आहे. पण महाराष्ट्रामध्ये हवामान व पाण्याची उपलब्धता यांचा विचार करून तीन हंगामात ऊस लागण केली जाते. ऊसाचे किफायतशीर उत्पादन मिळविण्यासाठी १५ जुलै ते १५ फेब्रुवारी या दरम्यान ऊसाची लागवड करणे योग्य आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथील शास्त्रीय अभ्यासानुसार प्रामुख्याने तीन हंगामामध्ये ऊसाची लागवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे ते हंगाम असे-
सुरू हंगामी (हंगामी/एकसाली लागवड)
१) सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. या कालावधीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण व हंगाम हिवाळ्यात येत असल्याने तापमान कमी राहून उगवण कमी प्रमाणात होते. पिकाचा कालावधी एक वर्षाचा असल्याने उत्पादनही कमी मिळते. या हंगामातील लागवडीच्या ऊसास मुख्य वाढीचा काळ कमी मिळतो आणि बऱ्याच वेळा पाण्याचा ताण बसल्याने उत्पादनात घट येत असते. या हंगामातील ऊस साधारणतः १३ ते १४ महिन्याच्या आत गळीतास योग्य ठरतो. या हंगामात सरासरी १०० टन / हे उत्पादन मिळते.
पूर्व हंगामी
२) हा हंगाम १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या एक महिन्याच्या कालावधीचा आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात तापमान भरपूर असल्यामुळे व आर्द्रतेचे प्रमाणही बऱ्यापैकी असल्याने ऊसाची उगवण चांगली होते. पण मुख्य वाढीच्या काळात पीक उन्हाळ्यात सापडते. त्यामुळे कायिक वाढीवर मर्यादा येतात. पण जूननंतर हा वेग वाढतो. १२ महिन्यापासून १५ महिन्यापर्यंत या हंगामातील ऊसाची पक्वता वाढत जाते. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील साखर कारखाने नोव्हेंबरमध्ये चालू होतात. पण बऱ्याच वेळा सुरूवातीच्या कालावधीमध्ये साखर उतारा कमी मिळत असतो. पण लवकर पक्व होणाऱ्या गटातील लागण पूर्व हंगामी केल्याने सुरूवातीच्या काळातील साखर उतारा उंचावू शकतो. ऊसाचे सरासरी उत्पादन १२५ मे.ट/हे मिळते.
आडसाली
आडसाली लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीत केली जाते. हा कालावधी खरीप हंगामात येत असल्याने पावसाळा असतो. जमिनीचे योग्य तापमान, आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने हे हवामान उगवणीस अनुकूल असते. या हंगामातील ऊसास दोन पावसाळे मिळत असल्याने मुख्य वाढीचा काळ जास्त राहून ऊसाची बाढ जोमदार होते. साधारणतपणे १६ महिन्यात ऊस पक्क होतो व पुढे तो १८ महिन्यापर्यंत पक्वता टिकवून ठेवतो.
या हंगामातील लागवडीचे उत्पादन १५० टन/हे. एवढे मिळते. पण या हंगामासाठी ज्यादा कालावधी, खते, पाणी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने या लागवडीखालील क्षेत्र मर्यादित ठेवण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पुढील कालावधीमध्ये पाण्याचा वापर आणि उपलब्धता या बाबत शासकीय धोरण इ. बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. म्हणून कारखाना कार्यक्षेत्रातील या हंगामातील ऊस लागवडीचे क्षेत्र एकूण ऊस क्षेत्राच्या १०% पर्यंतच मर्यादित असावे.
शास्त्रीय पद्धतीने शिफारस केलेल्या कालावधीमध्ये वाणनिहाय ऊस लागवड करणे हितावह असते. पण बऱ्याच वेळा महाराष्ट्रामधील ऊस उत्पादक शेतकरी मे महिन्यामध्ये आडसालीची तर मार्च एप्रिलमध्ये सुरू ऊसाची लागण करतात. अशी बिगर हंगामी ऊस लागण केल्यास त्याचे अनेक तोटे होतात. बिगर हंगामी लागणीमुळे ऊसाची उगवण अत्यंत कमी होते. कारण हवामानातील बदल याचा परिणाम कमी व उशीरा उगवण आणि फुटव्यावर होतो.
ऊसाची शारीरिक वाढ होत असताना अवेळी लागणीमुळे होणाऱ्या तापमान व आर्द्रतेतील बदलांमुळे ऊसाची शारीरिक वाढ थांबते. जाडी व उंची वाढण्याच्या क्रियेत अडथळे निर्माण होतात. अवेळी लावलेल्या ऊसास उदा. मे महिन्यात लावलेला ऊस शारीरिक वाढीसाठी कमी कालावधी मिळाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात पक्व होण्यास सुरूवात होते आणि पुढे ऊसास अधिक तुरे येतात.
हा ऊस ७ ते ८ महिन्यातच जीवनक्रम संपवतो. हा बदल फक्त लावण अवेळी झाल्यामुळे होतो. तसेच मार्च ते मे या कालावधीतील ऊस पिक लागण केले असल्यामुळे सदरचे पिक रोगकिडीस बळी पडते उदा. खोड कीड, काणी इ. तसेच काही वेळा शेतकरी मे-जून मध्ये लागण करतात, असा ऊस आडसाली म्हणून नोंदविला जातो. या परिस्थितीमध्ये ७ ते ८ महिन्यातच ऊसाला तुरे येतात. हा प्रकार पाणथळ किंवा खारवट चोपण जमिनीत हमखास होतो. या ऊसापासून उत्पादन फारच कमी मिळते, तसेच साखर उताऱ्यावही विपरीत परिणाम होतो.
या सर्व गोष्टी विचारात घेता ऊस लागवड ही हंगामातील शिफारस कालावधीतच करावयास हवी हे लक्षात येते. कारण त्यामुळे हंगामनिहाय अधिक उत्पादन व अधिक साखर उतारा मिळणेस मदत होते. म्हणून महाराष्ट्रामधील साखर कारखाना क्षेत्रातील ऊस लागण करीत असताना सुरू हंगामातील लागण अंदाजे १५ ते २० टक्के क्षेत्र, पूर्व हंगामाकरिता हे क्षेत्र ३० ते ३५% आणि आडसाली खालील क्षेत्र १० टक्क्यापर्यंत तर खोडव्याखालील क्षेत्र ४० ते ४५% असणे साखर कारखानदारीच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. या नुसार क्षेत्रनिहाय ऊस लागवड करताना नियोजन करावे.
ऊस लागण पद्धती
ऊस लागवड शिफारस केलेल्या हंगामात महाराष्ट्रामध्ये केली जाते. ऊसाचे उत्पादन किफायतशीर मिळण्याच्या दृष्टीने आधुनिक ऊस लागवड पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे असते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व ऊस शेती व्यवसाय करणाऱ्यांनी या बाबत अद्ययावत अशी माहिती करून घेणे आवश्यक आहे. मात्र ऊस लागणीपूर्वी बेणे प्रक्रिया करूनच लागण करावी. कारण रासायनिक बीज प्रक्रिया मुळे रोग उदा. मूळकुज, कांडी कुज आणि चाबूक काणी व किडींचा उदा. खवले कीड, कांडी कीड, पिठ्या ढेकूण इ. चा बंदोबस्त करण्यास मदत होते आणि जैविक बीज प्रक्रिया करून ५०% नत्र व २५% स्फुरद रासायनिक या अन्नद्रव्याची बचत करता येते. म्हणून खालीलप्रमाणे बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे.
१) रासायनिक बेणे प्रक्रिया – लागणीसाठी वापरण्यात येणारे बेणे लागणीपूर्वी १०० ग्रॅम कार्बेन्डेझीम अधिक ३०० मिली ३०% प्रवाही डायमेथोएट १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे आणि त्यात बेणे कांडी १५ ते २० मिनिटे बुडवून प्रक्रिया करावी. हुमणीचा प्रार्दुभाव असल्यास बीज प्रक्रियेसाठी इमिडॅक्लोप्रीड ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी वापरून १० मिनिटे बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर बेणे सावलीत सुकण्यास ठेवावे. अशी प्रथम बीज प्रक्रिया करावी.
२) जैविक बीज प्रक्रिया – त्यानंतर १० किलो अॅसिटोबॅक्टर आणि १.२५० किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ऊसाच्या टिपऱ्या ३० मिनिटे बुडून नंतर लागण करावी किंवा १ लिटर अॅसिटोबॅक्टर अधिक १ लिटर स्फुरद विरघळविणारे जिवाणू १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून त्यात ऊसाची टीपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागण करावी.
अ) जमिनीच्या प्रकारानुसार ऊस लागण
1) ओली लागण – हलक्या व मध्यम जमिनीसाठी या पद्धतीची शिफारस केलेली आहे. सरीत पाणी सोडून त्यामध्ये पायाने अथवा हाताने कांडी दाबताना त्यावरील डोळ्याची दिशा वरंब्याच्या बाजूला राहील अशा रितीने ५-७ सें.मी. खोल दाबावी. टिपऱ्या उघड्या राहणार नाहीत किंवा डोळे खालील बाजूस जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
मध्यम ते भारी जमिनीत ओली लागण केल्यास बेणे कांडी खोलवर दाबली जाते त्यामुळे उशीरा उगवण होते आणि बऱ्याच वेळा उगवण मागे पुढे होते.
२) कोरडी लागण – कोरडी लागण मध्यम ते भारी जमिनीत, पट्टा पद्धतीत अगर चोपण जमिनीत फायद्याची ठरते. या लागण पद्धतीमध्ये सरीमध्ये कुदळीच्या सहाय्याने ५-७ सेंमी चर घेवून (चळी घेवून) योग्य अंतरावर ऊस बेणे मांडून ते मातीने झाकून दाबावे. नंतर हलके पाणी सोडावे. या पद्धतीमध्ये बेणे योग्य खोलीवर व अंतरावर लावल्यामुळे उगवण लवकर म्हणजे १०-२० दिवसामध्ये होऊन जोमदार कोंब येऊन एकरी पक्व ऊसाची संख्या ४० हजार पर्यंत मिळण्यास मदत होऊन उत्पादनात वाढ दिसून येते.
ब) ऊस बेणे डोळ्यांच्या संख्येनुसार लागण पद्धत
१) पारंपारिक पद्धतीने दोन डोळा टिपरी
तीन डोळा टिपरीऐवजी, दोन डोळे बेणे टिपरी लागणीची शिफारस मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी केलेली आहे. दोन डोळा टिपरी तोडताना डोळ्याचा वरचा भाग १/३ व खालचा भाग २/३ ठेवावा. दोन टिपरीतील १५ ते २० सेंमी अंतर ठेवून दोन्ही डोळे वरव्यांच्या बाजूस राहतील अशा बेताने लागण केल्यानंतर २०-२५ दिवसानी ऊस उगवण होते.
दोन डोळ्याच्या २५००० टिपऱ्या/हे. लागतात. सरीच्या रूंदीनुसार टिपऱ्यांची संख्या लागणी साठी बापरावी. सर्वसाधारणपणे एक चौरस फुटास एक ऊस या प्रमाणे एकरी ४० ते ४५ हजार ऊस असावेत. या लागण पद्धतीमध्ये ऊस पिकास सूर्यप्रकाश व हवा सारखीच मिळत असल्याने ऊसाची जाडी वाढून उत्पादनात वाढ होते. तसेच ३५ टक्क्यापर्यंत बेण्याची बचत होऊन या वरील होणारा खर्च कमी होतो. या पद्धतीने तीनही हंगामासाठी ही ऊस लागण पद्धत उपयुक्त आहे (तक्ता क्र १).
२) एक डोळा कांडी लागण पद्धत
एक डोळा कांडी तयार करताना डोळ्याच्या वरचा भाग १/३ व डोळ्याच्या खालचा भाग २/३ ठेवावा. ही पद्धत आडसाली व पूर्व हंगामी लागवडीस योग्य आहे. एक डोळा लागण करताना दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. यामध्ये बेणे खर्चात ६६% पर्यंत बचत होते. सुरू हंगामात लागण केल्यास जास्त तापमान, पाण्याचा अपुरा पुरवठा, खोड किडीचा प्रादुर्भाव यामुळे नांग्या पडून उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. पण काही विशिष्ठ परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे असलेल्या सुविधांनुसार व अनुकूल हवामान असल्यास एक डोळा कांडी लागण पद्धत करतात. संभाव्य नांगे पडण्याची शक्यता गृहीत धरून एक डोळा कांडी पद्धतीची लागण करतानाच प्लॅस्टिकच्या पिशवीत अंदाजे १ हजार रोपे तयार करावीत आणि गरजेनुसार तुटआळी भरण्यास त्यांचा वापर करावा, असे केल्याने उत्पादन चांगले येण्यास मदत होते.
२) एक डोळा रोप लागवड
- या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खालीलप्रमाणे रोपे तयार केली जातात.
- • प्लॅस्टिक पिशवीतील एक डोळा कांडी रोपवाटिका
- • प्लॅस्टिक ट्रे एक डोळा कांडी रोपवाटिका
- • गादी वाफा एक डोळा कांडी रोपवाटिका
- • सरीतील एक डोळा कांडी रोपवाटिका
- • सपाट वाफा एक डोळा कांडी रोपवाटिका
- • स्कूप डोळा रोपवाटिका
- प्लॅस्टिक पिशवितील एक डोळा कांडी रोपवाटिका
या पद्धतीमध्ये प्लॅस्टिक पिशवीत एक डोळा कांडी रोपे एक ते दीड महिना वाढत असल्याने जमिनीस विश्रांती मिळते. मशागतीची कामे करण्यास वेळ मिळतो किंवा रोप वाढीच्या कालावधीमध्ये हिरवळीचे पिक घेता येते. जर पहिल्या पिकाची काढणी लांबल्यास अशी पिशवीतील रोपे वापरून हंगाम साधता येतो, पाण्याची बचत होते. सर्व रोपांना अन्नद्रव्ये, पाणी आणि वाढीसाठी लागणारे सर्वच घटक समप्रमाणात मिळतात. त्यामुळे ऊसाची वाढ जोमदार होवून उत्पादनात वाढ होते. क्षारयुक्त किंवा चोपण जमिनीमध्ये अगर चुनखडी जमिनीमध्ये ऊसाची उगवण खूपच कमी होत असते. अशा परिस्थितीमध्ये प्लॅस्टिक पिशवीतील एक डोळे कांडी रोपे लागण केल्यास रोपांच्या वाढीचा जोम चांगला राहून वाढ चांगली होते.
रोपे तयार करण्याची पद्धत
रोपे तयार करणेसाठी गरजेनुसार किंवा लागणाऱ्या रोपांच्या संख्येनुसार पोयट्याची माती व चांगले कुजलेले शेणखत ३:१ या प्रमाणात घेऊन सर्वसाधारणपणे १ ब्रास माती मिश्रणासाठी २५ किलो युरिया, ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकून मातीत चांगले मिसळावे. असे एकत्रित मिश्रण ५ बाय ७ इंच आकाराच्या व तळाला ५-६ छिद्रे असलेल्या पिशवीत भरावीत. पाणी देण्यासाठी पिशवीत वरचा भाग १ ते १.५ इंच रिकामा ठेवावा. पिशव्यात लागणीसाठी ९ ते १० महिने वयाचे चांगले रसरशीत बेणे ऊसाचे १.५ ते २.५ इंच लांबीचे एक डोळ्याचे तुकडे करावेत. या बेण्यास ०.१% कार्बेन्डेझीम व अॅसिटोबॅक्टर अधिक स्फुरद विरघळविणारे जीवाणू यांची बेणे प्रक्रिया करून टिपरीचा डोळा वरच्या बाजूस राहील अशा पद्धतीने टिपरी उभी लावावी. पिशव्यांना झारीच्या सहाय्याने पाणी द्यावे. एक दीड महिन्याच्या रोपांना ३ ते ४ पाने आल्यानंतर रोपांची शेतात लागवड करावी या पद्धतीमध्ये रोप जगण्याचे प्रमाण ९८% पर्यंत असल्याने ऊस संख्या वाढून उत्पादन अधिक मिळते. क्षारपड जमिनीत रोप लागण फायदेशीर दिसून आली आहे.
प्लॅस्टिक ट्रे एक डोळा कांडी रोपवाटिका
अलीकडे रोपे तयार करण्याकरिता प्लॅस्टिकचे ट्रे वापरले जातात. एका ट्रेमध्ये ४२, ६० किंवा ७२ पर्यंत रोपे तयार करता येतात. ४२ कप असलेल्या ट्रे मधील एका कपाचे ७ बाय ५ बाय ५ सें.मी. आकारमान असते. पण ही संख्या वाढल्यास हे आकारमान बदलते. अशा ट्रे मध्ये बऱ्याच वेळा पोयटा माती किंवा वरीलप्रमाणे तयार केलेले मातीचे मिश्रण न वापरता त्याच्याऐवजी निर्जंतुकीकरण केलेले किंवा निर्जंतुकीकरण न केलेले कोकोपीट वापरून रोप तयार केली जातात.
काही वेळा गांडूळ खताचाही वापर करतात. ४२ कपाचे ट्रे असल्यास एका कपात सरासरीने १८० ते २२० ग्रॅम कोकोपीट / गांडूळखत लागते. गांडूळ खताचा माध्यम म्हणून वापर केलेस उगवण लवकर व जोमदार होते. तसेच त्याचा ऊस लागण क्षेत्रात फायदा होतो. असे ट्रे भरताना २/३ ट्रे भरून ३ ते ५ सेंमी लांबीची कांडी लावावी व त्यावर गांडूळ खत किंवा कोकोपीट टाकून थोडा दाब द्यावा व नंतर झारीच्या सहाय्याने हलके पाणी द्यावे. ट्रे खरेदी करताना एकूण लागणाऱ्या रोपांच्या संख्येनुसार ट्रे ची खरेदी करावी.
एका पाकिटामध्ये ५० ट्रे असतात. म्हणजे २१०० प्रमाणे एकरी लागणीच्या अंतरानुसार रोपे तयार करावीत. लवकर उगवण होणेसाठी ट्रे एकमेकांवर ठेवून गोणपाटाने झाकावेत व पाणी देण्याच्या वेळी सदरचे ट्रे पाणी देवून परत याच पद्धतीने ठेवावेत. ३-४ दिवसांनी डोळ्यांचे निरीक्षण करावे. एखाद डोळा खराब झाल्यास डोळा कांडी वापरावी. लागणीनंतर अंदाजे ३०-३५ दिवसापर्यंत तीन पानावर आलेले रोपे लागणीस वापरावीत. लागण करताना ट्रे रोपे सहजासहजी निघणेसाठी ट्रे वर थोडे पाणी शिपंडावे म्हणजे रोष अलगद निघण्यास मदत होते.
गादीवाफा एक डोळा कांडी रोपवाटिका
गादीवाफा पद्धतीने ऊसाची रोपे शेतकऱ्यांकडील क्षेत्रावर तयार करता येतात. याकरिता शेतीच्या एका बांधाकडील बाजूला किंवा शेडजवळी मोकळ्या जागेत १० फुट बाय ३ फुट बाय १५ सेंमी अशा आकाराचे गादी वाफे ऊस लागणीच्या क्षेत्राचा विचार करून १ ते १.५ महिना अगोदर तयार करून घ्यावेत. गादीवाफ्यांची रूंदी ३ फुट व लांबी कमीत कमी १० फुट किंवा उपलब्ध जागेनुसार सपाट असल्यास अधिक लांबी घेवून १५ सें.मी. उंचीचे वाफे तयार करावेत. २ वाफ्यामध्ये एक फुटाचे अंतर असावे.
गादी वाफे तयार केलेनंतर चांगले कुजलेले चाळून घेतलेले शेणखत गादी वाफ्याच्या वरच्या थरात मिसळून घ्यावे. १० फुट बाय ३ फुट बाय १५ सेंमी या गादी वाफ्यावर अंदाजे १२ ते १४०० डोळे बसतात. या पद्धतीने एकूण क्षेत्रासाठी लागणाऱ्या रोपांकरिता गादीवाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर उभा किंवा आडवा डोळा मातीआड करून झाकून घ्यावा व झारीच्या सहाय्याने हलके पाणी द्यावे. गादी वाफ्यावर भात पिंजराचे आच्छादन द्यावे. एक दिवस आड झारीने पाणी देवून डोळे टपोरे किंवा फुगलेले दिसल्यानंतर दोन वाफ्यातील पाटाच्या माध्यमातून हलके हलके पाणी द्यावे. साधारणतः ३०-३५ दिवसांनी ३ ते ४ पानावर रोपे आली असताना लागणीस वापरावीत. लागण करण्याअगोदर गादी वाफा चांगला भिजवून घ्यावा. म्हणजे रोपे व्यवस्थित काढता येतात. या पद्धतीने कमी खर्चात रोपवाटिका करता येते.
सरीतील एक डोळा कांडी रोपवाटिका
सरी वरंबा पद्धतीने रानाची आखणी केलेनंतर शेतकरी गरजेनुसार ३-४ सऱ्यांमध्ये गोणपाट पसरून त्यामध्ये एकडोळा कांड्या अंथरूण वरब्यांच्या मातीने झाकून त्यांना हलकेसे पाणी देवून रोपे तयार करून त्याचा वापर करतात. अगदी अल्प खर्चात रोपे तयार करून इतर खर्च ही कमी करता येतो.
v) सपाट वाफा एक डोळा कांडी रोपवाटिका
या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांकडे असलेल्या घराजवळील अगर मोकळ्या पडलेल्या जागेवर स्वच्छता करून घेवून ५-७ सेंमी जाडीचा मातीचा थर टाकला जातो. ५ बाय ३ फुट आकाराचे छोटे वाफे तयार करून दोन वाफ्यामध्ये ६ इंच अंतर ठेवून एक डोळा कांडी २.५ ते ३ सें.मी. अंतराने लागण करून मातीआड केला जाते व त्यास झारीच्या सहाय्याने हलके पाणी दिले जाते. ३ ते ४ पानावर आलेनंतर रोप लागणीच्या वेळी वाफसा आलेनंतर वाफ्यातील रोपे काढून लागणीस वापरावीत. ही पद्धतही बरेच शेतकरी सध्या करीत आहेत. या पद्धतीत खर्चात फारच बचत होते.
vi) स्कूप डोळा (एक डोळा) रोप वाटिका
बटाट्याचे डोळे ज्या पद्धतीने काढून लागण केली जाते. त्याच प्रकारे ऊस कांडीवरील डोळा मशीनच्या सहाय्याने काढला जातो आणि तो लहान प्लॅस्टिक पिशवीत किंवा ट्रे मध्ये लागण करून दोन ते तीन पानावर आल्यानंतर लागणीसाठी वापरतात. या पद्धती बाबत प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणावर काम झाले असून ही पद्धत मोठ्या प्रमाणात व्यापारी तत्त्वावर लागणीस अयोग्य आहे. पण नवीन सुधारित वाण अथवा आशादायक वाण देशातील इतर राज्यातून आणण्याच्या दृष्टीने या पद्धतीत एक टन बियाण्याचे डोळे काढल्यास त्यांचे वजन १०० किलो पर्यंतच येते. त्यामुळे वहातूक व हाताळणी इ. दृष्टीने उपयुक्त ठरते व असे डोळे आणून लागण केल्यास त्यापासून बियाणे निर्मिती करणे सोपे जाते. मात्र अशा पद्धतीने तयार केलेली रोपे लागणीस वापरू नयेत.
रोपांची पुनर्लागण
शेतात ४ ते ५ फुट अंतराने सऱ्या सोडून एक, दीड ते दोन फुट अंतरावर रोपांची मांडणी करून वापशावरती खड्डा काढून प्लॅस्टिक पिशवी काढून मातीच्या गोळ्यासह रोपे त्या खड्यात लावावीत. त्यानंतर प्रत्येक रोपाच्या भोवती चांगला दाब द्यावा. या पद्धतीने १००% रोप जगतात. काही वेळा काही रोपे खराब झालेस एक आठवड्याचे आत त्यांची पुनर्रलागण करावी. याच प्रमाणे एक डोळा प्लॅस्टिक पिशवीतील रोप वाटीका, प्लॅस्टिक ट्रे, गादी वाफा, सरीतील रोपवाटिका आणि सपाट वाफा रोप वाटीका यामधील ही रोपे अंतराप्रमाणे खड्डे काढून रोपाचा खालचा बुंधा मातीत गाडला जाईल, अशा पद्धतीने लागण करावी. पण या पद्धतीमध्ये कांड्याची जवळ लागण झाल्यास रोपे लागणीस काढताना मुळ्या तुटण्याचे प्रमाण जास्त झाल्यास जोमदार वाढीवर परिणाम होतो.
क) शेतातील आराखड्यानुसार उस लागण
१. पारंपरिक पद्धत
पारंपरिक पद्धतीमध्ये २.५ ते ३ फुट रुंदीच्या सऱ्या सोडून त्यामध्ये सव्वाई किंवा दिडकीने लागण केली जाते. यामुळे फुटव्यांची संख्या जास्त होवून मर जास्त प्रमाणात होते. ऊसास जाडी कमी मिळते, ऊस पिकास योग्य हवा व सुर्यप्रकाश इ. मिळत नसल्याने उत्पादनात घट येते. बियाणे वरील खर्च जास्त होतो.
२. लांब सरी पद्धत
या लागण पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार ३० ते ५० मीटर पर्यंत सरीची लांबी ठेवावी. जमिनीचा उतारा ०.३ ते ०.६ टक्क्यापर्यंत असेल तर उताऱ्याच्या दिशेने सरी सोडून व उतार ०.६ टक्क्यापेक्षा जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून लागण करावी. अशा लांब सरी पद्धतीमध्ये पाणी देताना एका वेळी तीन ते चार सरीस पाणी द्यावे. या पद्धतीने ऊस लागण केल्यास ऊस वाढ जोमदार होवून उत्पादनातही वाढ होते. जमिनी खराब होण्याचे प्रमाणही कमी होते. या पद्धतीमध्ये यंत्राच्या सहाय्याने बरीच कामे करता येतात. या लागवड पद्धतीमध्ये सरीची रूंदी हलक्या जमिनीत ३ फुट आणि मध्यम भारी जमिनीमध्ये ३.५ फुट ते ४ फुटापर्यंत ठेवावी.
३. पट्टा पद्धत (२.५ फुट बाय ५ फुट किंवा ३ फुट बाय ६ फुट)
ऊस पिकाची बऱ्याच वेळा दोन सरीतील अंतर कमी ठेवून दाट लागण केली जाते. अशा वेळी सुरूवातीला ऊस पिक चांगले दिसते. त्यामुळे शेतही झाकले जाते. सुरूवातीला मोठ्या बांधणीपर्यंत जवळ जवळ एक लाख ते दीड लाख ऊस संख्या मिळते. पण मोठ्या बांधणीनंतर बरेच फुटवे अगर ऊस मरून जातात आणि तोडणीपर्यंत ही संख्या ४० हजारापर्यंत प्रति एकरी मिळत असते. यावरून असे दिसते की सुरवातीच्या कालावधीतील संख्येच्या २/३ फुटवे/ऊस मरतात.
जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. हलक्या जमिनीत २.५ फुट अंतरावर रिजरच्या सहाय्याने सलग सऱ्या पाडून हंगामनिहाय आंतरपिकानुसार एक आड एक सरी पट्टा पद्धतीमध्ये एक सरी ऊस लागण व एक सरी रिकामी म्हणजे एक आड एक पट्टा पद्धतीमध्ये ५ फुटाचा रिकामा पट्टा राहील. बऱ्याच वेळा दोन सरी ऊस लागण व तिसरी सरी मोकळी म्हणजे दोन आड एक सरी लागण पद्धत होय. यामध्येही ५ फुटाचा पट्टा राहतो.
मध्यम भारी जमिनीत सलग तीन फुट अंतरावर सऱ्या सोडून पहिल्या दोन सरीत ऊस लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळीत ६ फुट अंतराचा पट्टा तयार होतो. पट्टा पद्धतीने ऊस लागण करणे फायद्याचे आहे. या पद्धतीमुळे पिकास भरपूर सुर्यप्रकाश व हवा मिळून ऊस पिकाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात वाढ होते. मुख्य ऊस पिकावर अनिष्ठ परिणाम न होता आंतरपिकाचे उत्पादन मिळते आणि तणांचा प्रार्दुभाव ही कमी दिसून येतो.
आधुनिक सिंचन पद्धतीसाठी पट्टा पद्धत अतिशय योग्य आहे. कारण यात गरजे इतके पाणी देणे शक्य होते. तसेच अवर्षण काळात कमी पाण्यात ऊस पिक वाचविता येते. पट्टा पद्धतीमधील ऊस शेतीसाठी यांत्रिकीकरण करणे सोयीचे होते. पिक संरक्षण चांगल्या पद्धतीने करता येते. ऊस बांधणीनंतर दोन ओळीमध्ये एक सरी तयार होते. या सरीत पाणी देवून दोन्ही ओळी भिजवता येतात. त्यामुळे पाण्याची बचत होते.
४. रूंदी सरी पद्धत
या पद्धतीमध्ये सरीची रूंदी ४ ते ५ फुटापर्यंत ठेवली जाते. काही वेळा सपाट, भारी जमीन असल्यास ६ फुट ही अंतर ठेवले जाते. जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ६० मीटर पर्यंत ठेवणेस हरकत नाही. या पद्धतीमुळे भरपूर सुर्यप्रकाश व हवा मिळत असल्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते. पिकाची वाढ ही जोमदार होवून अधिक उत्पादन मिळते. मुख्य ऊस पिकावर अनिष्ठ परिणाम न होता आंतरपिके घेता येतात. तणांचा प्रार्दुभाव कमी होतो. ऊसातील यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत योग्य आहे.
ऊस तोड यंत्राचे सहाय्याने सुलभपणे करता येते. खोडवा पिकांचे व्यवस्थापनात पाचट सऱ्या मध्ये व्यवस्थित बसते. आवश्यक तेवढे पाणी देता येते. त्यामुळे जमिनी खराब होण्याचे प्रमाण कमी होते. पिक संरक्षण व आंतर मशागत सुलभतेने करता येते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या गरजेनुसार व परिस्थितीनुसार योग्य अशा लागण पद्धतीचा अवलंब करावा.
५. सपाट वाफा पद्धत
या पद्धतीचा वापर सपाट, पाणथळ व चोपण जमिनीमध्ये करावा. योग्य ती पूर्वमशागत झाल्यावर जमिनीच्या प्रकारानुसार १ ते १.२० मीटर अंतरावर कुदळीने अथवा लाकडी नांगराने उथळ सऱ्या काढून ४-५ ओळीनंतर छोटा वरंबा तयार करावा. सऱ्यांची लांबी १५-१८ मीटर ठेवावी. कोरडी लागण करून वाफ्यास पाणी द्यावे. लागण उथळ केल्यामुळे ऊसाची उगवण लवकर होते. सुरवातीचे काळात दोन ओळीत आंतरपीक घेता येते.
६. खड्डा पद्धत
ज्या जमिनी चिबड झाल्या आहेत किंवा पाण्याचा निचरा कमी होतो अशा जमिनीत खड्डा पद्धतीने ऊस लागण करावी. जमिनीचे प्रकारानुसार एक ते दीड मीटर अंतरावर ४५ सें. मी. व्यासाचे व दीड ते दोन फुट खोल खड्डे घ्यावेत. खड्ड्यातील माती बाजूला काढून खड्ड्याच्या तळाशी पालापाचोळा टाकून कंपोस्ट व रासायनिक खत मातीत मिसळून खड्डे भरून घ्यावेत. खड्ड्यामध्ये सायकलचे चाकाचे स्पोक प्रमाणे दोन डोळ्यांची टिपरी लावून कोरडी लागण करावी. पाण्यासाठी दोन ओळीस एक पाट तयार करून प्रत्येक खड्ड्यात पाणी द्यावे. ऊसाची उगवण चांगली व लवकर होते. शिवाय खतमात्रा ऊसाचे पिकाचे मुळाजवळ दिल्यामुळे पिकास त्वरित उपलब्ध होवून वाढ जोमदार होते. फुटव्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ऊस संख्या वाढून उत्पादन वाढते.
(डॉ. जे. पी. पाटील हे ख्यातनाम ऊसतज्ज्ञ असून, विविध पुस्तकांचे लेखक आहेत.)