ऊस तोडणी मुकादमाला तब्बल ३३ लाखांचा गंडा

अकलूज पोलिसांत १३ जणांविरोधात गुन्हा दाखल
अकलूज : साखर कारखान्याल ऊस तोडणीसह वाहतूकही करून देतो असे सांगून ऊस तोडणी मुकादमाला तब्बल ३३ लाख रुपयांना फसविल्याची घटना अकलूज येथे घडली. याप्रकरणी सुनील अजिनाथ बांगर (४९) यांनी संबंधित १३ जणांविरोधात एकूण ३३ लाख ३४ हजार ९०० रुपये किमतीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील अजिनाथ बांगर (४९) हे अकलूजच्या सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सह. साखर कारखाना , यशवंतनगर व दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. माळीनगर या कारखान्यांना ऊस तोडणी कामगार पुरविण्याचे काम करतात. वर्ष २०२०-२१, वर्ष २०२१-२२ आणि २०२२-२३ या गळीत हंगामासाठी त्यांच्याकडून विविध तेरा लोकांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर व दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. माळीनगर या साखर कारखान्याला उसाचा पुरवठा करण्यासाठी ऊसतोड मजुर पुरवितो. तसेच ट्रक्ट्रर वाहन व ड्रायव्हर पुरवितो, असे म्हणून विश्वास संपादन केला. त्यानंतर रोख स्वरूपात व बँक खात्यावर उचल म्हणून पैसे घेऊन संबंधित साखर कारखान्याला उसाचा पुरवठा करण्यासाठी ऊसतोड मजूर, वाहतुकीसाठी ट्रॅक्ट्ररही उपलब्ध केले नाहीत. मध्येच काम बंद केल्यामुळे संबंधित तेरा व्यक्तींना यांना बांगर यांनी संपर्क करून ऊस तोड मजूर व ट्रॅक्ट्रर वाहन उपलब्ध करून देण्यास सांगितले. मात्र त्यांनी टाळाटाळ केली. उचल म्हणून घेतलेले पैसेही परत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सुनील बांगर यांनी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
गोरख उमाजी जाधव (रा. शेंद्री, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी १ लाख १५ हजार रूपये, तुकाराम सोपान भोसले व प्रतोल तुकाराम भोसले दोघे (रा. यशवंतनगर, ता. माळशिरस, जि.सोलापूर) यांनी ४ लाख रुपये, श्रीरंग शिवाजी बंडलकर (रा. चाकोरे, ता. माळशिरस) व, बाबासो श्रीरंग बंडलकर (रा. चाकोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी मिळून दीड लाख रुपये, काशिलिंग कृष्णा झंजे (रा. झंजेवाडी, ता. माळशिरस जि. सोलापूर) यांनी ३ लाख रुपये, बापु पांडुरंग मदने (रा. वेळापूर ता. माळशिरस जि. सोलापूर) यांनी ४ लाख रुपये, सोमनाथ दादा झेंडे (रा. शिंदेवाडी, ता. माळशिरस, जि.सोलापूर) यांनी ५० हजार रुपये, निलचंद भिवा भिल ( रा. खेडभोकरी, ता. चोपडा, जि. जळगांव) यांनी आडीच लाख रुपये, मयुर अशोक भिल (रा. मोरद, ता. चोपडा, जि. जळगांव ) व किरण सुरेश मोरे (रा.सुसरी, वरणगांव, ता. भुसावळ, जि. जळगांव) यांनी मिळून दोन लाख सत्तर हजार रुपये, रविंद्र प्रकाश भिल (रा. खेडीभोकरी, ता. चोपड़ा, जि. जळगांव) याने दोन लाख ६१ हजार रुपये, राजेश सुकलाल वडर (रा. हनुमान पेठ, साकळी, ता. साकळी, जि. जळगांव) याने ११ लाख ३८ हजार ९०० रुपये रक्कमेची अशा १३ जणांविरोधात एकूण ३३ लाख ३४ हजार ९०० रुपये किमतींची आर्थिक फसवणुक केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.