सरकारमान्य कोणताही वजनकाटा गृहित धरण्याची शक्यता -शुगरटुडे विशेष
मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर व्हावी यासाठी सरकारमान्य कोणत्याही वजनकाट्यावरील उसाचे वजन गृहित धरले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवकरच सर्व साखर कारखान्यांना कळवले जाईल, अशी माहिती ‘शुगरटुडे’ला सूत्रांकडून मिळाली.
साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. यंदाच्या साखर हंगामाच्या सुरुवातीलादेखील हा मुद्दा पुन्हा विविध शेतकरी संघटनांनी ऐरणीवर घेतला. त्यामुळे याविषयी सर्वच स्तरांवर चर्चा सुरू झाली.
‘शुगरटुडे’ला मिळालेल्या माहितीनुसार, हा मुद्दा कायमचा निकाली काढण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. खासगी आणि सहकारी अशा सर्व सहकारी साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनने केली आहे. या विषयावर सविस्तर उहापोह झाल्यानंतर साखर आयुक्तालयाने अनेक पर्यायांवर विचार केला.
सर्व सरकारमान्य वजनकाटे प्रमाणितच असतात, त्यामुळे त्यावरील उसाचे वजन सर्वांना मान्य व्हायला हरकत नसावी, या विचाराप्रत आयुक्तालय आले आहे, असे समजते. ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शंका आहे त्यांनी आपल्या ऊस गाडीचे वजन बाहेरच्या प्रमाणित काट्यावर करून त्याचे प्रमाणपत्र घ्यावे आणि ते साखर कारखान्याला सादर करावे. ते साखर कारखान्यांनीही मान्य करावे. जेणेकरून एका प्रलंबित मुद्यावर सर्वमान्य तोडगा निघू शकेल, असे साखर प्रशासनाला वाटते.
यासंदर्भात एक आदेश काढून लवकरच सर्व साखर कारखाने आणि ऊस उत्पादक संघटनांना कळवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नुकताच पुण्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी वजनकाट्याबाबतची मागणी नेटाने मांडली होती. सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करावेत, असा संघटनेचा आग्रह आहे.
[…] सरकारमान्य कोणताही वजनकाटा गृहित धरण… […]