‘सोमेश्वर‘वर सांस्कृतिक महोत्सवात ऊसतोड मजुरांच्या मुलांचाही सहभाग

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या मुलांचा सांस्कृतिक महोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ऊस तोड, मोळ्या बांध, वाढे विक अशी कामे करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांनी नृत्य, गाणी, ड्रामा, लोकगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये मुलांसोबत पालकांनीही नृत्याचा आनंद लूटला. यावेळी तब्बल दोनशे मुलांनी यात सहभाग घेतला होता.
कारखान्याच्या वतीने ऊसतोड मजुरांच्या स्थलांतरित मुलांच्या शिक्षणासाठी कोपीवरची शाळा हा राज्यातला अभ्यासवर्ग चालविला जातो. या अभ्यासवर्गामार्फतच चार महिने शिक्षण दिले गेले आणि मुले गावाकडे परतण्याआधी कला सादर करण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव भरविण्यात आला. सोमेश्वर कारखाना परिसरातील ऊसतोड मजुरांच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आपली कला सादर केली.
दोनशेपेक्षा अधिक मुलांनी आपापल्या कला यामध्ये सादर केल्या आणि एक हजार ऊसतोड मजुरांनी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलेला दाद दिली. यामध्ये मुलांसोबत पालकांनीही नृत्याचा आनंद लूटला.
कारखान्याने मुलांना स्टेज, साउंड, लायटिंग उभारून दिले होते. महोत्सवाचे उद्घाटन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी इब्जा संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर, संचालक शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, ऋषिकेश गायकवाड, सरपंच हेमंत गायकवाड, अनिल चाचर, गीतांजली बालगुडे, पत्रकार महेश जगताप, युवराज खोमणे उपस्थित होते.
भलरी गड्या, येळकोट येळकोट जय मल्हार, तू ये ना, ऊस तोडायला चला अशा गाण्यांवर स्टेजवरील मुलांसह पालकही थिरकले. संतोष होनमाने, आरती गवळी, नीतीन मोरे, अश्विनी लोखंडे, शुभम गावडे, अनिता ओव्हाळ, विकास पवार, विकास देवडे, अक्षय इथापे, सागर शिंदे, अस्मिता कांबळे, कार्तिक लोखंडे, रोहित नगरे यांनी संयोजन केले. प्रकल्प समन्वयक संतोष शेंडकर यांनी प्रास्ताविक केले. बाबुलाल पडवळ व नौशाद बागवान यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी खोमणे यांनी आभार मानले.