पंचगंगा कारखान्याची तीनच महिन्यांत पुन्हा निवडणूक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचे नवे संचालक मंडळ केंद्रीय सहकार खात्याने बरखास्त केले असून, नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम २९ एप्रिलला सुरू होणार असून, ११ मे रोजी मतदान होणार आहे. या आदेशामुळे सत्तारूढ पी. एम. पाटील गटाला धक्का बसला आहे. त्याच वेळी कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम यांना दिलासा मिळालेला आहे.

पंचगंगा कारखान्याची निवडणूक तीन महिन्यांपूर्वी बिनविरोध झाली होती. दरम्यान, रजनीताई मगदूम, अशोक पाटील, अण्णासाहेब शहापुरे यांच्यासह त्यांच्या गटाच्या उमेदवारांचे अर्ज सूचक, अनुमोदक यांचा ऊस आलेला नाही, सर्वसाधारण सभेला अनुपस्थिती आदी कारणांमुळे बाद ठरवले होते. केंद्रीय सहकार कायद्यात अशी तरतूद नसल्याचे कारण देत यावर केंद्रीय सहकार खात्याकडे संबंधितांनी दाद मागितली होती. या तक्रारीची दखल घेत झालेली निवडणूक बेकायदेशीर ठरवत संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय सहकार खात्याने दिले आहेत.

या निर्णयामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. कारण अलीकडेच झालेली निवडणूक बेकायदेशीर पद्‌धतीने झाली. विरोधकांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद ठरवले होते. त्याची केंद्रीय सहकार खात्याने दखल घेत संचालक मंडळ बरखास्त केले. हा सभासदांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया कारखान्याच्या माजी अध्यक्ष रजनीताई मगदूम यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील म्हणाले की, फेरनिवडणूक हा तांत्रिक मुद्दा आहे. आम्ही अनेक वर्षे कारखान्याचा कारभार उत्तमपणे सांभाळला आहे. त्यामुळे सभासदांचा आमच्यावर विश्वास असून, ही निवडणूकदेखील आम्ही निश्चितपणे जिंकू.

तीन महिन्यांपूर्वीच बिनविरोध निवडणूक

पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक दोन महिन्यापूर्वी होऊन एकूण 17 संचालकांच्या निवडणुकीसाठी 17 अर्जच शिल्लक राहिल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 19 जानेवारीच्या निवडणूक सभेत जाहीर केले होते. त्यास मंजुरी मिळण्याबाबत सहकार निवडणूक प्राधिकरण दिल्ली यांना 21 जानेवारी रोजी कळविले होते. मात्र त्यास अद्यापही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे संचालक मंडळ व सभासदांतून चलबिचल निर्माण झाली होती.

दरम्यान, निवडणुकीसाठी सभासदांनी भरलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करताना पोटनियमानुसार निवडणुकीच्या पाच वर्षांच्या कालावधीत सलग 4 वर्षे ज्या सभासदाचा ऊस कारखान्याकडे गळितास आला नसेल, त्यास अपात्र ठरविण्यात आले होते. तसेच त्या सभासदाचा ऊस इतर कारखान्याकडे गळितास गेला असेल, त्याचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरविला होता. उमेदवाराचे सूचक व अनुमोदक असणार्‍या सभासदाचा ऊस सलग चार वर्षे आला नसेल व त्याचाही ऊस इतर कारखान्यास गळितास गेला असेल तर त्या उमेदवाराचा अपात्र ठरविला होता.

89 उमेदवारांनी 104 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 48 अर्ज हे छाननीत अपात्र ठरविले होते. याबाबत दिल्ली येथील सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा होऊन जिल्हाधिकार्‍यांना त्यांनी फेर निवडणुकीचे आदेश दिले आहेत. सूचक व अनुमोदक हे सदस्य आहेत. त्याना कोणतीही अट लावता येणार नाही. त्यामुळे पंचगंगा साखर कारखान्याची फेरनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणुकीचे वेळापत्रक
मतदान ११ मे रोजी
■ अर्ज भरणे – २९ एप्रिल ते ३ मे
■ अर्ज छाननी – ५ मे
■ अर्ज माघारी – ६ मे
■ मतदान – ११ मे
■ मतमोजणी – १२ मे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »