खासदारकीची ऑफर नाकारणारे समर्पित ज्ञानतपस्वी!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर उद्योगाच्या इतिहासामध्ये एखादा प्रकल्प उभा करण्यासाठी नियोजनापासून ते प्रत्यक्ष गाळपापर्यंत किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एका जिद्दी नेतृत्वाने हे सर्व गणितच बदलून टाकले. डॉ. शिवाजीराव कदम सर यांनी बामणी-पारे सारख्या ओसाड माळरानावर अवघ्या ९ महिन्यांत ‘उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड’ या भव्य प्रकल्पाची उभारणी करून सहकार आणि उद्योग क्षेत्रात एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. कला, संस्कृती, समाजकारण, साहित्य इ. क्षेत्रांमध्येही ते सक्रियपणे कार्यरत आहेत. मात्र एक क्षेत्र त्यांनी जाणीवपूर्वक टाळले, ते म्हणजे राजकारण… त्यांना ऑफरही आल्या होत्या. पण त्यांनी त्या नम्रपणे नाकारल्या. अशी व्यक्तिमत्त्वे संपूर्ण समाजासाठी आदर्श आणि प्रेरणादायी असतात. ते ज्ञानतपस्वी तर आहेतच, ते कार्यमहर्षीदेखील आहेत. आधी केले आणि मग जगाला सांगितले…, असा त्यांचा स्वभाव आहे. … आणि जे करायचे ते केवळ उत्तम नाही, तर सर्वोत्तम असायला हवे, याकडे त्यांचा कटाक्ष असतो.

अशा या महान व्यक्तिमत्त्वाचा १५ जून रोजी वाढदिवस… यंदाचे त्यांचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

ओसाड माळरानाचा कायापालटः

यांचे डोकं फिरलंय का?

सांगली जिल्ह्यातील बामणी-पारे (ता. विटा) हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेला भाग होता. जेव्हा डॉ. कदम यांनी इथे साखर कारखाना काढण्याचा संकल्प केला, तेव्हा स्थानिक लोक त्यांच्या निर्णयावर शंका घेत होते. इथे पाणी नाही, ऊस नाही, मग कारखाना कसा चालणार? असा प्रश्न विचारला जात होता. काही लोक तर म्हणायचे, यांचं डोकं फिरलंय का? परंतु, डॉ. कदम यांना आपल्या लोकांच्या कष्टावर आणि नियोजनावर विश्वास होता. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या भागात कृष्णा नदीचे पाणी आणण्यासाठी ज्या योजना आखल्या होत्या, त्याचा आधार घेत डॉ. कदम यांनी विकासाचे हे धाडस केले. केवढी ही दूरदृष्टी!

विमानाने आणली यंत्रसामग्री

कारखान्याची उभारणी ही केवळ तांत्रिक प्रक्रिया नव्हती, तर तो एक आर्थिक आणि मानसिक संघर्ष होता.

वेळेचे महत्त्व आणि आर्थिक गणितः कारखाना उभारणीसाठी त्यावेळी १०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. जर कारखाना वेळेत सुरू झाला नसता, तर दोन वर्षांच्या व्याजाचा बोजा (आयडल कर्ज) डोक्यावर पडला असता. त्यामुळे त्यांच्या मनातील चलबिचल सुरू होती. त्यावर उपाय शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता.

मिलचे महत्त्वाचे ‘गियर बॉक्स’ इटलीहून येणार होते. ते बोटीने येण्यास बराच वेळ लागणार होता. वेळ वाचवण्यासाठी डॉ. कदम यांनी ३ कोटी रुपये जादा खर्च करून ही अवजड यंत्रसामग्री विमानाने भारतात आणली. या प्रकल्पासाठी पैशांची निकड इतकी होती की, डॉ. कदम यांनी स्वतःचे राहते घर बँकेला तारण दिले आणि त्यातून उभे राहिलेले पैसे प्रकल्पात ओतले. स्वतःच्या निर्णयावर असलेल्या अढळ विश्वासाचे हे उत्तम उदाहरण आहे.

तंत्रज्ञान आणि पर्यावरण

उदगिरी शुगर हा केवळ एक व्यावसायिक प्रकल्प नसून तो पर्यावरणाशी नातं सांगणारा प्रकल्प आहे. त्यासाठी त्यांनी खर्चाचा विचार न करता, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. अमेरिकेतून आयात केलेले आरपीजी (RPG) तंत्रज्ञान वापरणारा हा आशियातील पहिला कारखाना ठरला. या तंत्रज्ञानामुळे चिमणीतून बाहेर पडणारी धूळ आणि राख हवेत न मिसळता खाली जमा होते, ज्याचा वापर शेतकरी सेंद्रिय खत म्हणून करू शकतात. तसेच त्यांनी व्यापक प्रमाणात वृक्षारोपण करून एकेकाळी उजाड असलेल्या या परिसरात आता घनदाट झाडी फुलवली आहे. डॉ. कदम यांनी सुरुवाती पासूनच वृक्षारोपणावर भर दिला, ज्यामुळे आज तिथे ‘वन’ साकारले आहे.

शेतकरी कल्याण

डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मते, कारखाना हा केवळ साखरेचा कारखाना नसून ते शेतकऱ्यांच्या समृद्धीचे केंद्र आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताकडे त्यांचा अधिक कल आहे. स्थापनेपासूनच या कारखान्याने आपल्या सभासद शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा रक्कम दिली आहे. यंदा पार पडलेल्या हंगामातही (२०२५-२६) उदगिरी शुगरने एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देऊन शेतकऱ्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

पर्यावरणातील अतिउत्तम काम, तसेच या पारदर्शक आणि फायदेशीर व्यवहारामुळेच कारखान्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सर्वोत्तम आर्थिक आणि पर्यावरण व्यवस्थापनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच कोल्हापुरात स्थापन झालेल्या आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या ‘भारतीय शुगर’तर्फे त्यांना ‘साखर महर्षी’ हा पुरस्कारही देण्यात आला आहे.

Udagiri Sugar

भविष्यातील वाटचाल

बदलत्या काळाची पावले ओळखून ‘उदगिरी शुगर’ने उप-उत्पादनांवर (By-products) भर दिला आहे.

इथेनॉल विस्तारः सुरुवातीला ३० हजार लिटर प्रतिदिन (KLPD) क्षमता असलेली डिस्टिलरी आता १ लाख ५० हजार लिटर प्रतिदिन (KLPD) पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे कारखान्याची आर्थिक स्थिरता अधिक मजबूत होणार आहे.

कुलपती पदापर्यंत

डॉ. शिवाजीराव कदम यांचा वैयक्तिक जीवन प्रवास एखाद्या महाकाव्यासारखा आहे. सोनसळ सारख्या छोट्या गावात जन्मलेले डॉ. कदम ‘कमवा आणि शिका’ योजनेतून शिकले. त्यांच्या गावात कसल्याही सोयीसुविधा नव्हत्या. रुग्णांना बाजल्यावरून (कॉट) ५-५ किलोमीटर दवाखान्यात नेण्याचे लोकांचे कष्ट त्यांनी लहानपणी पाहिले आहेत. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान सर्वश्रुत आहे. भारती विद्यापीठाची पायाभरणी दिवंगत द्रष्टे नेते डॉ. पंतगराव कदम यांनी केली आणि त्याचा विस्तार डॉ. शिवाजीराव कदम यांनी केला, त्यावर प्रगतीचा आणि लोकमान्यतेचा कळस त्यांनीच चढवला. ही कामगिरीदेखील त्यांनी खूप कमी कालावधीत केली आहे. आज ते भारती विद्यापीठाचे कुलपती असूनही त्यांची पाळेमुळे मातीशी घट्ट जोडलेली आहेत.

सोनसळला पाचवीपर्यंतच शाळा होती. ती गावच्या मंदिरात भरायची. तेथेच त्यांनी पाटीवर धडे गिरवले. पुढील शिक्षणासाठी त्यांना लहानपणीच गाव सोडावे लागले. पुढं शिरसगावला शिक्षणासाठी जाताना त्यांना आठ किलो मीटर पायपीट करावी लागत असे. पुढील शिक्षणासाठी ते कराडला आले. रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळवला. तेथे ‘कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षण घेताना, आपल्या गुणवत्तेकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. पुढे कराडच्या सायन्स कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले.

डॉ. कदम यांची शिक्षणाची आवड पाहून घरच्यांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. वसतिगृहात राहून त्यांनी पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे पीएच. डी. केली. त्यांची गुणवत्ता पाहून, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये फार्मसी म्हणजेच औषधनिर्माण शास्त्र शाखा त्यांच्या प्रयत्नामुळेच सुरू झाली.. भारताच्या फार्मसी कौन्सिलवर त्यांनी सलग दहा वर्षे, तर

विद्यापीठ अनुदान आयोगावर सहा वर्षे काम केले. पुढे त्यांनी भारती विद्यापीठासाठी संपूर्ण जीवन वाहून घेतले. आज भारती विद्यापीठाच्या भारतातील विविध १८० शाखा आणि या संस्थेचा शिक्षण क्षेत्रात असलेला दबदबा हे त्यांच्याच मेहनतीचे फलित आहे. त्यांच्या नावावर अनेक पेटंट आहेत.

कौटुंबिक त्याग आणि राजकारण

मोठ्या संस्था उभ्या करताना डॉ. कदम यांना आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देता आला नाही. त्यांच्या सौभाग्यवतींनी घराची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. मुलांचे शिक्षण आणि नातेवाईकांचे संगोपन खंबीरपणे सांभाळले. कदम परिवारातील सर्वांची मुले डॉ. शिवाजीराव कदम यांच्याच घरी राहून शिकली आणि लहानाची मोठी झाली. हे सारे श्रेय त्यांच्या पत्नी सौ. रजनीताई कदम यांचेच आहे.

राजकारणाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, सांगली लोकसभेसाठी मला अनेक ऑफर्स होत्या, मात्र अचानक आलेल्या या ऑफर्समुळे माझ्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले, शेवटी मी शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील कामाला प्राधान्य दिले.

डॉ. कदम सर सांगली लोकसभेसाठी उभे राहिले असते, तर आरामात निवडून आले असते आणि देशाच्या संसदेत अभिमानाने जाऊन बसले असते, असे आजही त्यांच्या चाहत्यांना वाटते. मात्र अशी ऑफर नम्रपणे नाकारणे, हे सोपे काम नव्हते. त्यावरून त्यांचे आपल्या कामाप्रति असलेले समर्पण आणि श्रद्धा दिसून येते.

‘उदगिरी शुगर’ ही केवळ एक वास्तू नसून डॉ. शिवाजीराव कदम यांच्या जिद्दीची, पारदर्शकतेची आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाची साक्ष आहे. ओसाड माळरानावर नंदनवन फुलवणारा हा प्रकल्प भारतीय साखर उद्योगासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

उद्योजक, इंजिनिअर सुपुत्र डॉ. राहुलदादा आणि डॉ. शिवाजीराव कदम

आता त्यांचे इंजिनिअर चिरंजीव डॉ. राहुलदादा कदम हे गेल्या दीड दशकापासून उदगिरी शुगरची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांनी कारखान्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेले आहे. वडिलांपासून प्रेरणा घेऊन ते साखर कारखान्याला ऊर्जा निर्मितीचे हब करण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यांचे जीवनकार्य शब्दांत बांधता येत नाही, एवढे ते व्यापक, महान आहे. त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा !

आज पंच्याहत्तरीत देखील त्यांची कामाची उमेद, ऊर्जा आणि लोकसंपर्काची आस पूर्वीसारखीच कायम आहे. ती अखंड राहावी, ही प्रार्थना.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »