थोरात कारखान्यासाठी ११ मे रोजी निवडणूक; अर्ज भरण्यास सुरुवात

अहिल्यादेवी नगर : येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक ११ मे रोजी होणार असून, यासाठी अर्ज भरण्यास ३ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
१५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असेल. उमेदवारांची यादी व चिन्हवाटप २ मे २०२५ रोजी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार धीरज मांजरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदारयादी २५ फेब्रुवारी व अंतिम मतदारयादी १९ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.