उसाच्या फडात आढळले बिबट्याचे दोन बछडे

पुणे : शिरूर तालुक्यातील करंदी येथे एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. वन विभागाने दोन्ही बछड्यांना ताब्यात घेतले आहे.
संतोष दरेकर यांच्या शेतात मंगळवारी उसतोड सुरू असताना फडात ऊसतोड कामगारांना बिबट्याचे बछडे दिसले. याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना मिळताच वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियतक्षेत्र अधिकारी बबन दहातोंडे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर, सर्पमित्र श्रीकांत भाडळे यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा दोन्ही बछड्यांना ताब्यात घेतले.
या वेळी पोलिस पाटील वंदना साबळे, पंडित पवार, संतोष ढोकले, सनी ढोकले आदी उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी शेतकरी व नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत माहिती देत बिबट्यांच्या बछड्यांना त्यांच्या आईच्या पुनर्भेटीसाठी शेतात सुरक्षित ठेवले आहे.
दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाताना काळजी घ्यावी, रात्रीच्या वेळी शेतात फिरू नये, शेतात जाताना आवाज करावा, शेतात काम करताना मोठ्या बोलावे, असे आवाहन देखील वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांनी केले आहे.