ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसूती; अहिल्यानगरमधील घटना

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यानगर : सध्या राज्यात सुरू असलेल्या गाळप हंगामाला वेग आला असून, त्यासाठी ऊसतोड कामगारही आपल्या ऊसतोडीच्या कामात व्यस्त होताना दिसत आहेत. मात्र, अशा वेळेत कळत-नकळत कामगारांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नसतो. या मजुरांकडून कधी स्वतःच्या दुर्लक्षामुळे किंवा स्थानिक ग्रामीण वैद्यकीय सेवेअभावी आपल्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते. तशा घटनांही उघडकीस येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे.  वैद्यकीय सेवेत झालेला विलंब आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याने संबंधित महिलेला या शोकांतिका घटनेला सामोरे जावे लागले.

अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जेऊर परिसरात बुधवारी ( दि ९) वैद्यकीय सेवेत झालेल्या विलंबामुळे एका ऊसतोडणी करणाऱ्या महिलेची प्रसूती रस्त्यातच झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, यानिमित्ताने पुन्हा ग्रामीण आरोग्यसेवांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकहून नेवासा तालुक्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या प्रियंका जाधव या महिलेच्या पोटात अचानक वेदना सुरू झाल्याने तिला जिल्ह्यातील घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी औषधोपचार न करता फक्त रक्त व लघवी तपासून अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी करा, असा सल्ला देत परत पाठवले. अतिवेदना सुरू असलेल्या महिलेची गंभीर दखल घेण्याऐवजी तिला प्रवासासाठी बाहेर पाठविल्याची संतापजनक बाब या उघड समोर आली आहे.

संबंधित महिलेला जिल्हा रुग्णालयाकडे नेत असताना जेऊर परिसरात तिची प्रसूती झाली. याची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आई आणि नवजात बाळाला जिल्हा रुग्णालयात हलवले. आई व बाळाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »