‘शुगरटुडे’च्या दिवाळी अंकाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे : साखर आणि सहकार क्षेत्राला समर्पित ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी मंत्री रजनीताई सातव, साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, डॉ. पी. डी. पाटील, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, ‘शुगरटुडे’चे मुख्य संपादक नंदकुमार सुतार, वरिष्ठ पत्रकार आणि निवडणूक तज्ज्ञ चंद्रकांत भुजबळ आदींची उपस्थिती होती.
विशेषांकामध्ये ‘साखरेसाठी द्विस्तरीय दर पद्धती’ या विषयावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे. नामवंत ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ नेते शरद पवार, साखर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे बी. बी. ठोंबरे, संजय खताळ, प्रकाश नाईकनवरे, भास्कर घुले, ज्येष्ठ पत्रकार भागा वरखेडे, शेतकरी नेते राजू शेट्टी आदींनी आपले विचार व्यक्त केले आहेत.
साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले यांची विशेष प्रदीर्घ मुलाखत विशेषांकाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांनी कारकीर्दीच्या पहिल्या दिवसांपासून ते निवृत्तीपर्यंतच्या कालखंडातील आपल्या प्रवासावर दृष्टिक्षेप टाकला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेषांकाचे कौतुक केले. साखर क्षेत्राविषयी एवढे चांगले मासिक प्रकाशित होत असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी साखर उद्योगातील कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील ‘शुगरटुडे’चा विशेषांकदेखील श्री. चव्हाण यांना भेट देण्यात आला.