डॉ. विखे पाटील कारखान्याच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे

अहिल्यादेवीनगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी सोपान शिरसाठ यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे उपस्थित होते.
अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीसाठी संचालकांच्या विशेष बैठकीत डॉ. विखे यांच्या नावाची सूचना संचालक सुनील तांबे यांनी मांडली. संचालक अशोक घोलप यांनी अनुमोदन दिले. शिरसाठ यांच्या नावाची शिफारस किरण दिघे यांनी मांडली. संचालक अनिल भोसले यांनी अनुमोदन दिले.
संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जनसेवा मंडळाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी आभार मानले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांचेही भाषण झाले.