ऊस : सासू-सुनेचे मनोगत

रविवारची कविता
ऊसाची लागणं होऊ दे गं सुनबाई , होऊ दे गं सुनबाई
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
ऊसाची लागणं झाली हो सासुबाई , झालीहो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥
ऊसाची निंदणी होऊदे गं सुनबाई, होऊ दे गं सुनबाई
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
ऊसाची निंदणी झाली हो सासुबाई, झाली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥२॥
ऊसाची नोंदणी होऊ दे गं सुनबाई, होऊ दे गं सुनबाई
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
ऊसाची नोंदणी झाली हो सासुबाई, झाली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥
तागाची बेवड होऊ दे गं सुनबाई ,होऊ दे गं सुनबाई
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
तागाची बेवड झाली हो सासुबाई झाली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥
बाळबांधणी ,कटभरणी कर गं सुनबाई, कर गं सुनबाई
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
बाळबांधणी ,कटभरणी केली हो सासुबाई, केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥
ऊस संजीवनी अन जीवामृत ऊसाला दे गं सुनबाई, दे गं सुनबाई
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
ऊस संजीवनी अन जीवामृत दिले हो सासुबाई ,दिले हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥
ऊसात पाचट पसरवं गं सुनबाई ,पसरवं गं सुनबाई
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
ऊसात पाचट पसरवलं हो सासुबाई, पसरवलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा||७||
पाणी बंदची नोटीस येऊ दे ग सुनबाई, येऊ दे ग सुनबाई
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
पाणी बंदची नोटीस आली हो सासुबाई ,आली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥८॥
ऊसतोड होऊ दे गं सुनबाई,होऊ दे गं सुनबाई
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
ऊसतोड झाली हो सासुबाई ,झाली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥९॥
आणा फणी, घाला वेणी, जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी, घातली वेणी, गेली राणी माहेरा माहेरा
बघा सुनेने लिहिली ऊसाची कहाणी जाण्यास माहेरा ,माहेरा ॥१०॥
रचनाकार: वा. र. आहेर (साखर उद्योगातील तंत्र सल्लागार)