स्वाभिमानीचे थकीत ऊसबिलासाठी बेमुदत आंदोलन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम २०२४-२५ संपून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप ऊसबिले दिले नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर वेळोवेळी हेलपाटे मारून त्या-त्या वेळी मागणी करूनही ऊसबिले अदा केली नाहीत. या पार्श्वभूमीवर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी दिनाच्या दिवशीच येथील जि. प. समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, मोहसीन पटेल यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वीही अनेक वेळा थकीत बिलासाठी संघटनेने आंदोलने केली आहेत. साखर आयुक्तांनी जिल्ह्यातील गोकुळ शुगर, जयहिंद शुगर, मातोश्री शुगर, सिद्धेश्वर सहकारी, भिमा सहकारी, सहकार शिरोमणी, इंद्रेश्वर शुगर या साखर कारखान्यावर आरसीसीनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या पेरणीचा हंगाम सुरु असून, शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. पेरणी करण्यासाठी शेतात मशागत, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तांच्या आरआरसी आदेशाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना तात्काळ उसबिले जमा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार ,१ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.