गेवराईतील कृषीप्रदर्शन शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीचा मार्ग : बोत्रे-पाटील

गेवराई(बीड) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतीत उत्पादन वाढवावे आणि आर्थिक प्रगती साधावी, या उद्देशाने आयोजित केलेले कृषी प्रदर्शन अत्यंत स्तुत्य आहे. गेल्या १८ वर्षांच्या सातत्यामुळे या भागातील शेतीत मोठे सकारात्मक बदल झाले आहेत, असे प्रतिपादन ओंकार उद्योग समूहाचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी केले. गेवराई येथे महेश बेदरे यांच्या पुढाकाराने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या सोहळ्यासाठी माजी मंत्री बदामराव पंडित, भाजप नेते बाळराजे पवाले, युवा नेते युद्धाजित पंडित, तालुका कृषी अधिकारी गिरी, माजी जि.प. सदस्य बप्पासाहेब तळेकर, कृषी उद्यान पंडित राजेंद्र आतकरे, राजेंद्र मोटे, अजय दाभाडे, अमोल करांडे, मधुकर तौर, बाळासाहेब सानप, भागवत जाधव, विनोद नरसाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या शिस्तबद्ध नियोजनाचे आणि उत्कृष्ट मांडणीचे बाबुराव बोत्रे पाटील यांनी कौतुक केले असून, भविष्यातही या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली असून, गेवराई तालुक्यातील ऊस आज सोलापूर आणि धाराशिवसह इतर जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात पाठविला जात आहे. गेल्या १८ वर्षांपासून हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ करण्यासाठी आधुनिक आणि नाविन्यपूर्ण कृषी उपकरणांची मांडणी येथे करण्यात आली आहे.
बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले, आज अनेक परदेशांमध्ये शेती तंत्रज्ञान प्रचंड वेगाने विकसित झाले असून आधुनिक यंत्रणा, डिजिटल प्रणाली व संशोधनाच्या आधारे त्यांनी शेती क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. मात्र कृषीप्रधान देश असलेला भारत या बाबतीत काही प्रमाणात मागे राहिला आहे. अशा परिस्थितीत महेश बेदरे यांनी ग्रामीण शेतकऱ्यांसाठी उभारलेले हे कृषी प्रदर्शन आणि कृषिरथ हे शेती क्षेत्राला नवी दिशा देणारे असून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मोलाचे ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयोजनाबद्दल त्यांनी कृषिभूषण महेश बेदरे यांचे तोंडभरून कौतुक केले. प्रास्ताविक महेश बेदरे यांनी केले, सूत्रसंचालन मयूरध्वज औटी यांनी केले तर शिनुभाऊ बेदरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.






