ऊसतोड कामगारांच्या ओळखपत्रांचे काम कासव गतीने

२१ कोटींचे टेंडर, पण नोंदणी फक्त ७७७
बीड: लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळांतर्गत कामगारांची नोंदणी आणि ओळखपत्र वाटपाचे काम बीड जिल्ह्यात अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे येथील एका खासगी कंपनीला २१ कोटी रुपयांचे कंत्राट देऊनही आतापर्यंत केवळ ७७७ कामगारांची नोंदणी झाली असल्याने जिल्हा प्रशासन आणि कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही नोंदणी प्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. मात्र, दीड महिना उलटूनही आकडा हजाराच्या आतच असल्याने कंत्राटदार कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नुकतीच प्रशासकीय बैठक घेण्यात आली होती. : या बैठकीला समाजकल्याण सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले, विशेष लेखापरीक्षक सुपेकर आणि कामगार संघटनांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक न्याय भवन येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान यांच्या अध्यक्षतेखाली या कामाचा आढावा घेण्यात आला. बैठकीत यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींना कामाचा वेग वाढवण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, एकीकडे कामगार लाभांच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे एजन्सीकडून होणारा विलंब अनाकलनीय आहे,” अशी भावना महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्य सचिव आबासाहेब चौगले यांनी व्यक्त केली.






