ऊस उत्पादन वाढीसाठी कॉम्बो ट्रॅपचा वापर गरजेचा : बाळासाहेब थोरात

संगमनेर : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये गाळप क्षमतेची स्पर्धा तीव्र होत असताना, शेतकऱ्यांना चांगला भाव देणे आणि ऊस लागवडीसोबत एकरी उत्पादन वाढवणे ही काळाची गरज असल्याचे माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
थोरात कारखान्यात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. हुमणी अळीमुळे ऊस उत्पादनात अडथळे निर्माण होत असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कॉम्बो ट्रॅपचा वापर प्रभावी ठरेल, असे त्यांनी सांगितले. विषमुक्त शेतीकडे वाटचाल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
भारतीय कृषी संशोधन परिषद व ऊस संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, डॉ. योगेश थोरात, चेअरमन पांडुरंग घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना कॉम्बो ट्रॅप किटचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन चेअरमन घुले यांनी केले.






