आजचे पंचांग, जागतिक ब्रेल दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, जानेवारी ४, २०२४ युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक पौष १४, शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१३ सूर्यास्त : १८:१४
चंद्रोदय : ०१:१३, जानेवारी ०५ चंद्रास्त : १२:३३
शक सम्वत : १९४५ शोभन
ऋतू : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – २२:०४ पर्यंत
नक्षत्र : हस्त – १७:३३ पर्यंत
योग : अतिगण्ड – ०६:४९, जानेवारी ०५ पर्यंत
करण : बालव – ०८:५९ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २२:०४ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : कन्या – ०६:४६, जानेवारी ०५ पर्यंत
राहुकाल : १४:०६ ते १५:२९
गुलिक काल : ०९:५८ ते ११:२१
यमगण्ड : ०७:१३ ते ०८:३५
अभिजितमुहूर्त : १२:२१ ते १३:०५
दुर्मुहूर्त : १०:५३ ते ११:३७
दुर्मुहूर्त : १५:१८ ते १६:०२
अमृत काल : १०:५२ ते १२:३९
वर्ज्य : ०२:१९, जानेवारी ०५ ते ०४:०४, जानेवारी ०५

आज जागतिक ब्रेल दिन आहे ( अंध व्यक्तींसाठी तयार केलेली लिपी )
लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहय्याने वाचनाची पद्धत / लिपी विकसीत केली. आज त्यांचा जन्मदिन आहे.

|| कुणी निंदावे त्यालाही
करावा मी नमस्कार
कुणी धरावा दुरावा
त्याचा करावा सत्कार ||
||काही वागावे कुणीही
मीच वागावे जपून
सांभाळण्यासाठी मने
माझे गिळावे मीपण ||
|| कित्येकांना दिला आहे
माझ्या ताटातील घास,
कितिकांच्या डोळ्यातील
पाणी माझ्या पदरास!||
|| आज माझ्या आसवांना
एक साक्षी ते आभाळ
मनातील कढासाठी
एक अंधार प्रेमळसंत ||

पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांचा जन्म जानेवारी ४, १९१४ रोजी कर्नाटकातील इंडी या गावी झाला. कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए., बी.टी.डी. व बी.एड या पदव्या प्राप्त केल्यानंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९५६ ते १९७४ या काळात प्राचार्यपद देखील भूषवले. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात सहाध्यायी ना.मा.संत यांच्याशी त्या १९३५ साली विवाहबद्ध झाल्या.

१९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह ‘सहवास’ या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता ‘मृण्मयी’ नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.

ह्या कवियत्रीला लेखन , साहित्य निर्मितीचा गौरव म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार ,अनंत काणेकर पुरस्कार , साहित्य कला अकादमी पुरस्कार ,महाराष्ट्र शासन पुरस्कार , कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

१९१४: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी कवियत्री इंदिरा संत यांचा जन्म.(मृत्यू: १३ जुलै२०००)

विद्याधर गोखले – खासदार, नाटककार, लेखक, उर्दू शायर आणि संपादक यांसह मराठी पत्रकारितेमधलं एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व. विद्याधर गोखले यांनी लोकसत्ता दैनिकात बरीच वर्षं पत्रकार म्हणून आणि नंतर पाच वर्षं संपादक म्हणूनही काम पाहिलं.

त्यांचे खास त्यांच्या शैलीतले अग्रलेख लोकप्रिय असायचे. त्यांचा उर्दू काव्याचाही अभ्यास होता.

त्यांची महत्त्वाची ओळख आहे ती एकाहून एक सरस संगीत नाटकांचे नाटककार म्हणून! त्यांनी एकूण १८ नाटकं लिहिली. त्यातली काही ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक विषयांवर होती. त्यांची संगीत नाटकं आणि त्यातली नाट्यपदं यांची मोहिनी मराठी मनावर आजही आहे.
संगीत सुवर्णतुला, पंडितराज जगन्नाथ, मंदारमाला, जावयाचे बंड, चमकला ध्रुवाचा तारा, जय जय गौरीशंकर, साक्षीदार, अमृत झाले जहराचे, मदनाची मंजिरी, स्वरसम्राज्ञी, बावनखणी अशी त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत.
१९९३ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसंच मराठी नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.

१९२४: खासदार, नाटककार, लेखक, उर्दू शायर आणि संपादक विद्याधर गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर, १९९६)

घटना :
१४९३: क्रिस्तोफर कोलंबस त्यांच्या पहिल्या सफरीच्या शेवटी नव्या जगातून परत निघाले.
१६४१: कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये शिरले. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्स यांचा पराभव होऊन मग त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
१८४७: सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हॉल्व्हर पिस्तुल विकले.
१८८५: आंत्रपुच्छ (appendix) काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.
१८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.
१९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.
१९३२: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरू यांन दोन वर्षांची शिक्षा झाली.
१९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.
१९४८: ब्रम्हदेश (म्यानमार) देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९५८: १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.
१९५८: स्पुटनिक-१ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर परत उतरला.
१९५९: रशियाचे लुना-१ हे अंतराळयान चंद्राजवळ पोहोचले.
१९६२: न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.
२००४: नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंगळ ग्रहावर उतरली.
२०१०: बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन झाले.

• मृत्यू :

• १९०७: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचे निधन, सरस्वतीचंद्र हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० ऑक्टोबर , १८५५)
• १९०८: विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत राजारामशास्त्री भागवत यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर, १८५१)
• १९९४: सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार आर. डी. बर्मन तथा राहुल देव बर्मन तथा पंचमदा यांचे निधन. (जन्म: २७ जून १९३९)
• २०२१ : आठ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले, चार पंतप्रधांनां बरोबर मंत्री मंडळात मंत्रिपदी असणारे, तसेच बिहारचे राज्यपाल व काँग्रेसचे ज्येष्ठय नेते बुटासिंग यांचे निधन (जन्म :२१ मार्च, १९३४ )

जन्म :

१९०९: मराठी नवसाहित्यिकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.
१९२५: हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेते प्रदीप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २७ आक्टोबर, २००१)
१९४०: मराठी कादंबरीकार श्रीकांत सिनकर यांचा जन्म.
१९४१: केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट, १९९९)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »