उदगिरी शुगर ७.५ लाख टन गाळप करणार : डॉ. शिवाजीराव कदम
बाराव्या गळीत हंगामाचा काटा, मोळी पूजन उत्साहात
सांगली : यंदाच्या गळीत हंगामात उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने ७.५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यासाठी यंदाही शेतकऱ्यांचे नेहमीप्रमाणे उत्तम सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांनी केले आहे.
मौजे बामणी (पारे), ता.खानापूर, जि.सांगली येथील उदगिरी शुगरच्या सन 2024-25 साठी बाराव्या गळीत हंगामाचा काटा पूजन व मोळी पूजन समारंभ 4 नोव्हेंबरला डॉ. शिवाजीराव कदम व कारखान्याचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.राहुल कदम यांच्या शुभहस्ते व माजी आमदार , सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वनश्री मोहनराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी डॉ. कदम बोलत होते.
ते म्हणाले, आजअखेर कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय बाबीची नोंद घेऊन कारखानाच्या विविध विभागास तांत्रिक, आर्थिक व्यवस्थापन व पर्यावरण, उर्जा निर्मिती अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट योगदानासाठी अनेक पुरस्कार झाले आहेत. कारखान्याने आतापर्यंत एफआरपी प्रमाणे एकरकमी ऊस बिल पेमेंट केलेले असून, ऊस पुरवठादारास अल्प दराने साखरही वितरीत केली आहे. गतवर्षीच्या हंगामापर्यंत शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करून मोलाची मदत केलेली आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस उदगिरी कारखान्यास गळीतासाठी पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ.राहुल कदम म्हणाले, कारखान्यात आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणल्याने कार्यक्षमता वाढली आहे. शेतकऱ्यांसाठी अनेकविध योजना राबवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याशी एक अतूट नाते निर्माण झाले असून कारखानाविषयी समाधानाचे व आनंदाचे आणि परस्पर विश्वासाचे वातावरण आहे.
कारखान्याची गाळप क्षमता प्रति दिन 5 हजार मे.टन इतकी करण्यात आली असून डिस्टिलरी 1 लाख 50 हजार केएलपीडी क्षमतेची आहे. सहवीज निर्मिती प्रकल्प 14 मेगा वॅटचा आहे. या सिझन करिता सर्व तांत्रिक कामे पूर्ण झालेली असून कारखाना गाळपास सज्ज आहे.
कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील यांनी उपस्थित मान्यावारंचे स्वागत केले
यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू साबळे, जे. के. बापू जाधव, आबासाहेब चव्हाण, दिलीपराव पाटील, डी.एम.माने, आर. एम. पाटील, आनंदराव सांळुखे, खरमाटे, माउली सूर्यवंशी, गजानन सुतार, दौलतराव यादव, अभिजित शिंदे, महावीर शिंदे, आनंदराव शेळके, नंदकुमार पाटील, सुरेश पाटील, शरद शहा अशोक पाटील, निवासनाना पाटील आदींसह कडेगांव, पलुस व खानापूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व हितचिंतक सर्व विभाग खाते प्रमुख, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी मानले. यावेळी श्री सत्यनाराण पूजा कारखान्याचे इजिनिअर हणमंत शंकर वाघ यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली.