नवा विक्रम करण्यास उदगिरी शुगर सज्ज
‘आरपीसी’ तंत्रज्ञान वापरणारा आशियातील पहिला कारखाना, देशभरातील शिष्टमंडळांची भेट
सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. च्या विस्तारीकरणाच्या कामाचा आणि गाळप हंगामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. तसेच इथेनॉल उत्पादन तिपटीहून अधिक, तर गाळप क्षमता १२०० टीसीडीने वाढवण्यात येत आहे, ही दोन्ही कामे अवघ्या सात महिन्यांत पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित करू, अशी ग्वाही चेअरमन आणि एमडी डॉ. राहुलदादा कदम यांनी यावेळी दिली.
कारखान्याने सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले वेळेआधी अदा केली आहेत, यंदादेखील आमचा हाच प्रयत्न राहील. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रेम आम्हाला मिळत राहील आणि ते वृद्धिंगत होईल, असे उद्गारही त्यांनी काढले.
आपल्या प्रास्ताविकात डॉ. राहुलदादा म्हणाले, ‘उदगिरी शुगर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या ९ महिन्यात उभा केला. २५०० टीसीडी सुरुवात केली. गेल्या दहा वर्षात कारखान्याने प्रगतीचा आलेख उंचावत नेला. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रथमच भारतात आणले. परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी गेल्या वर्षी आरपीसी प्रणाली बसवली. ‘आरपीसी’ तंत्रज्ञान वापरणारा उदगिरी शुगर हा भारतातील पहिला साखर कारखाना आहे. ही प्रणाली पाहण्यासाठी देशभरातून लोक येत आहेत. आतापर्यंत ३५ कारखान्यांच्या शिष्टमंडळांनी उदगिरीला भेट दिली आहे. तसेच कोजन बॅक प्रेशर केल्यामुळे रोज सहा लाख लिटर पाण्याची बचत होत आहे.’
केंद्राच्या इथेनॉल धोरणामुळे कारखाने इथेनॉल उत्पादन वाढवत आहेत. आपला कारखानाही यात मागे नाही. इथेनॉल उत्पादन क्षमता प्रतिदिन ५५ हजार लिटरवरून १ लाख ७५ हजार लिटर करत आहोत. तसेच गाळप क्षमता चार हजार टीसीडी वरून ५२०० टीसीडी करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ही दोन्ही मोठी कामे सात महिन्यांत पूर्ण करण्यात येतील आणि तो साखर उद्योग क्षेत्रातील विक्रम ठरेल, असे सांगून, ‘आपला कारखानादेखील संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या नऊ महिन्यांत उभा करून गाळप घेतले होते, याचीही आठवण डॉ. राहुलदादा यांनी करून दिली.
उदगिरी शुगर अँड पॉवर लि. मध्ये जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे, उदा. कारखान्याचा इव्हॉपरेशन प्लँट फाइव्ह स्टेज असून, त्याची रोजची क्षमता ४०० मे. क्यूब, १.५ केजी प्रेशर आहे. हा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प आहे. डिस्टिलेशन डिपार्टमेंटमुळे वीज निर्मिती क्षमता वाढते, आपला हा प्रकल्प १.५ केजी प्रेशरने चालणारा महाराष्ट्रातील पहिला आणि देशातील पाचवा आहे, असे डॉ. कदम म्हणाले.
तसेच पाण्याचे प्रदूषण कमी करणारा स्पेंट वॉश ड्रायरमुळे स्पेंट वॉशचे खतामध्ये रुपांतर होते आणि पाणी, माती प्रदूषण टळते. आपल्या कारखान्यातील हा ड्रायर १७० केएलपीडीने चालणारा भारतातील पहिला आहे. एमबीआर सिस्टीम फॉर शुगर कंन्डेसेट अँड पॉलिसिंग या प्रणातीमुळे साखरेची गुणवत्ता आणखी सुधारते. आपल्या कारखान्यातील हे तंत्रज्ञान आशियातील पहिले आहे, असेही त्यांनी अभिमानाने टाळ्यांच्या गजरात सांगितले.
विविध प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान वापरल्याने एका हंगामात सहा कोटी लिटर पाण्याची बचत होत आहे, असे सांगून, आपल्या कारखान्याला उत्कृष्ट कोजन पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम, मा. आ. वनश्री मोहनशेठ (दादा) कदम, आ. अनिल बाबर, माजी मंत्री आणि आ. विश्वजित कदम, कारखान्याचे संचालक आदींची उपस्थिती होती.