‘उदगिरी’कडून एकरकमी एफआरपी जमा
सांगली : एकरकमी एफआरपी बिले देण्याची परंपरा निर्माण करणाऱ्या, बामणी पारे येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने सन २०२३-२४ च्या गळीत हंगामातील उसाच्या एफआरपीची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर यंदाही एकरकमी जमा केली आहेत.
कारखान्याने १९७ कोटी ७२ लाख रूपये जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांनी दिली.
उदगिरी कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती सुरू असून, कारखान्याने एकरकमी एफआरपी देण्याची परंपरा यावर्षीही जोपासली आहे. सन २०२३-२४ या गळीत हंगामात कारखान्याने ६ लाख ३७ हजार ८१६ मे. टन उसाचे गाळप केले आहे. केंद्र शासनाच्या एफआरपी धोरणानुसार उसाला प्रतिटन एकरकमी एफआरपी ३ हजार १०० रुपये होती. त्यानुसार कारखाना व्यवस्थापनाने एकूण गाळप झालेल्या उसाची एकरकमी एफआरपी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे, अशी माहिती डॉ. कदम यांनी दिली.
ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेशी करार करण्याचे काम सुरू असून ज्यांना ऊसतोडणी वाहतुकीचे करार करायचे आहेत त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. राहुल कदम यांनी केले.
केंद्र सरकारने पुढील हंगामात दिलासा द्यावा
केंद्र शासनाच्या धोरणानुसार साखर कारखान्यात तयार होणाऱ्या बी हेवी मोलॅसेसवर डिस्टलरीत प्रक्रिया करून इथेनॉल उत्पादन केले आहे. यावर्षी केंद्राने उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यावर बंदी घातल्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने पुढील वर्षी उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी देऊन कारखान्यांना, पर्यायाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण राबवावे, अशी अपेक्षाही अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांनी व्यक्त केली.