उत्तर प्रदेश नंबर वन, पण महाराष्ट्राचीच कामगिरी सरस
नवी दिल्ली : गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील २१० कारखान्यांच्या तुलनेत केवळ ११८ कारखाने सुरू होते. असे असले, तरी महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशात दुप्पट ऊस क्षेत्र होते आणि महाराष्ट्राचा गळीत हंगाम उत्तर प्रदेशच्या सुमारे महिनाभर आधीच संपला.
उत्तर प्रदेशात सुमारे २८ लाख हेक्टर तर महाराष्ट्रात सुमारे १४ लाख हेक्टर ऊस क्षेत्र होते. तरीही उत्तर प्रदेशात ऊस गाळप मात्र जवळजवळ महाराष्ट्राएवढेच झाले आहे.
ऐन हंगामापूर्वी झालेला अवकाळी पाऊस, बदललेले हवमान आदी घटकांचा महाराष्ट्राला फटका बसला. सर्व घटकांचा विचार करता महाराष्ट्राचीच कामगिरी यंदाही सरस अशीच आहे.
उत्तर प्रदेशच्या तुलनेत कमी ऊस क्षेत्र, अवकाळी पाऊस, इथेनॉलसाठी डायव्हर्शन आणि पिकावरील किडींचा फैलावर असल्याने महाराष्ट्रात ऊस आणि साखर उत्पादनात घसरण दिसून आली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.
उत्तर प्रदेशचे ऊस विकास आणि साखर मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी सांगितले की, हंगाम २०२२-२३ मध्ये उत्तर प्रदेशकडून उत्पादित एकूण साखर उत्पादन १०७.२९ लाख टन आहे. (यामध्ये ३.०५ लाख टन खांडसारी (तरल गुळापासून भौतिक रुपात काढलेली साखर) समाविष्ट आहे.) तर महाराष्ट्रात १०५.३० लाख टन साखर उत्पादन झाले. युपीमध्ये साखर कारखान्यांकडून एकूण ऊस गाळप १०८४.५७ लाख टन झाले आहे. तर महाराष्ट्रात १०५३ लाख टन झाले आहे. उत्तर प्रदेशात १९.८४ लाख टन साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये केले आहे. तर महाराष्ट्रात हा आकडा १५.७० लाख टन होता.
तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक हिसकावून घेतला आणि कामगिरीत सातत्य ठेवले. यंदा मात्र नैसर्गिक संकटांचा फटका बसल्याने उत्पादन घटले. तरी दोन्ही राज्यांमध्ये एकूण उत्पादनात फार फरक नाही.