वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये मोठा भ्रष्टाचार : विखे यांचे पवारांवर गंभीर आरोप

राहाता : ‘जाणता राजा’ने सहकारी संस्था मोडण्याचे काम करून सहकारी चळवळीचा वापर राजकीय दडपशाही आणि राजकीय स्वार्थासाठी केला. सहकाराच्या नावाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्थासुद्धा त्यांनी राजकीय अड्डा करून ठेवली आहे, असा गंभीर आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
वसंतदादा इन्स्टिट्यूट व रयत शिक्षण संस्था घरातील लोकांच्या ताब्यात दिल्याने या दोन्ही संस्थांमध्ये मोठा भ्रष्टाचार वाढला, असे ते म्हणाले.
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली २७ सप्टेंबर रोजी, शनिवारी झाली. त्या वेळी विखे बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कारखान्याचे उपाध्यक्ष सोपान शिरसाठ, उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे यांच्यासह संचालक उपस्थित होते.
विखे म्हणाले, ‘‘राज्यातील साखर कारखान्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ज्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर आहे, मात्र ती संस्था ‘जाणता राजा’ने ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ करून राजकीय अड्डा करून ठेवली. उसाबाबत कसलेही संशोधन नाही, बदलत्या युगात असलेले तंत्रज्ञानसुद्धा कारखान्यांना ते सांगू शकले नाहीत. हार्वेस्टरसुद्धा कारखान्यांना बाहेरून घ्यावे लागले.’’
सहकारी साखर कारखानदारीमध्ये ‘जाणत्या राजा’चे योगदान काय, असा सवाल करून विखे म्हणाले,‘ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयामुळे अडचणीत आलेली सहकारी साखर कारखानदारी पंतप्रधान टिकली. १२ हजार कोटी रुपयांचा साखर कारखान्यांवरील आयकर माफ झाला, तसेच इथेनॉल धोरणामुळे साखर उद्योगाला लाभ झाला. यापूर्वी कारखान्यांच्या प्रश्नांबाबत केवळ शिष्टमंडळे घेऊन पवार दिल्लीला जात असत. परंतु, निर्णय कुठले होत नव्हते.
रयत शिक्षण संस्थेची घटना शरद पवार यांनी बदलल्याने तेथेही त्यांनी घरातील लोकांना स्थान दिले. या संस्थेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. ‘रयत’मध्ये स्थानिक स्कूल कमिट्या राजकारणाचे अड्डे झाले आहेत. राजकीय हित जोपासण्यासाठी रयत आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा वापर करीत असल्याचा आरोपही विखे यांनी केला.
राज्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.