‘सह्याद्री’साठी आज मतदान; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

कऱ्हाड : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (शनिवारी) मतदान होत असून प्रत्यक्षात सकाळीच सुरुवातही झाली आहे. त्यासाठी सहकार विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाच तालुक्यांतील ६८ गावांतील ९९ मतदान केंद्रांवर हे मतदान होत आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तब्बल २५ वर्षांनंतर तिरंगी होत आहे. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील, आमदार मनोज घोरपडे, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, निवास थोरात, रामकृष्ण वेताळ यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.
संवेदनशील पाच गावांवर विशेष लक्ष
■ सह्याद्री कारखाना कार्यक्षेत्रातील किवळ, मसूर, पाली, कञ्हाड शहर, कोपर्डे हवेली ही मतदान केंद्रे संवेदनशील असल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. तेथे पोलिस दलाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नियमीत बंदोबस्तासह स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही फौजफाटा तैनात आहे.
सत्ताधारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनेल, आमदार मनोज घोरपडे आणि अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल आणि काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये प्रमुख लढत होत आहे.
कारखान्यासाठी कऱ्हाड गटात पाच हजार ११९, तळबीड गटात पाच हजार ५४३, उंब्रज गटात सहा हजार १६५, कोपर्डे हवेली गटात पाच हजार ६९, मसूर गटात पाच हजार २४७, वाठार किरोली गटात पाच हजार ६२ असे ३२ हजार २०५ एकूण मतदार आहेत. या निवडणुकीत २१ संचालक निवडण्यासाठी होणार आहे.