असाही ‘देशमुख पॅटर्न’ : बिनविरोध निवडणुकीचा रौप्यमहोत्सव

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, रेणा साखर कारखाना आणि विलास सहकारी साखर कारखाना या तिन्ही कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्यात आहेत. सलग 25 वर्ष निवडणूक बिनविरोध करत मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सहकार क्षेत्रात नवा पॅटर्न निर्माण केला आहे. हा ‘देशमुख पॅटर्न’ रौप्यमहोत्सव साजरा करत आहे.
लातुरातील या तिन्ही कारखान्यांचे सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनी पुन्हा एकदा सहकारातील आपली ताकद दाखवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीत धीरज देशमुख यांना पराभवाचा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबाने कारखान्यांची निवडणूक बिनविरोध घडवून आणली आहे.
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मांजरा परिवार वाढवला. याच परिवारातील साखर कारखान्यांचा पारदर्शक कारभारासाठी लौकिक आहे. त्यामुळेच गेल्या 25 वर्षांत कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक सातत्याने बिनविरोध झाल्या आहेत. तिन्ही साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘लोकनेते विलासराव देशमुख सहकार विकास पॅनल’चे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख हे मांजरा कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच श्रीशैल्य उटगे, अशोक काळे, तात्यासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पवार, भैरू कदम, सदाशिव कदम, नीलकंठ बचाटे, सचिन शिंदे, दयानंद बिडवे, अनिल दरकसे, बाळासाहेब पांढरे, मदन भिसे, नवनाथ काळे, निर्मला चामले, वसंत उफाडे, कैलास पाटील, धनराज दाताळ, छायाबाई कापरे, शंकर बोळंगे यांचाही बिनविरोध उमेदवारांमध्ये समावेश आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर अमित देशमुख, वैशाली विलासराव देशमुख, लताबाई देशमुख, रविंद्र काळे, नरसिंग बुलबुले, रसुल पटेल, गोवर्धन मोरे, वैजनाथ शिंदे, अनंत बारबोले, सतीश शिंदे (पाटील), दीपक बनसोडे, हणमंत पवार, नेताजी साळुंके, नितीन पाटील, रामराव साळुंके, तात्यासाहेब पालकर, रणजीत पाटील, अमृत जाधव, बरुरे शाम, भारत माने, सुभाष खंडेराव हे बिनविरोध निवडून आले आहेत.