सोनहिरा साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट, ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

पुणे : कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सांगली-कडेगांव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. रुपये 2 लाख 51 हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.




वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने (VSI) 2021-22 च्या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी व्हीएसआयचे उपाध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, महासंचालक संभाजी कडू पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.
कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार हा कोल्हापूर-कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. रक्कम रुपये एक लाख, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार यंदा दोन साखर कारखान्यांना विभागून देण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर प्रा.लि. आणि सोलापूरमधील श्री पांडूरंग सहकारी साखर कारखाना (शिरपूर,ता.माळशिरस) या कारखान्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे..
कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्काराचा (2020-21 करिता) मानकरी कडेगांव-सांगली येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. रक्कम रुपये एक लाख, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार सांगली जिल्ह्यातील क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यास (कुंडल,ता.पलूस) या कारखान्यास जाहीर झाला आहे.
कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार कराड-सातारा येथील जयवंत शुगर्स लिमिटेड या कारखान्यास जाहीर झाला आहे. रक्कम रुपये एक लाख, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या दोन्ही पुरस्काराचे स्वरुप आहे.
उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार
दक्षिण विभागात सांगली-खानापूर येथील उदगिरी शुगर अॅण्ड पॉवर लिमिटेड, मध्य विभागात दौंड शुगर प्रा.लि., उत्तरपूर्व विभागात कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना जालना-अंबड यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार
दक्षिण विभागात सातारा-कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना, मध्य विभागात पुणे-जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, उत्तरपूर्व विभागात लातूर-निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्यास हा पुरस्कार जाहिर झाला आहे. मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार 2021-22
कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार, 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक. पूर्वहंगामी राज्यात पहिला येण्याचा मान श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी राजाराम महादेव जाधव (पाडळी,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) यांना मिळाला आहे. त्यांनी हेक्टरी 86032 या जातीच्या उसाचे तब्बल 363.97 टनाइतके उत्पादन मिळविले आहे.
कै. वसंतराव नाईक पुरस्कार, 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक. सुरु हंगामात राज्यात पहिला येण्याचा मान द्वारकाधीश शुगरचे सभासद शेतकरी अनिल सुनिल दळवी (केळझर,ता.सटाणा,जि.नाशिक) या महिला शेतकर्याने मिळविला आहे. त्यांनी हेक्टरी व्हीएसआय 08005 या जातीच्या उस लागवडीतून हेक्टरी 235.89 टनाइ.तके उत्पादन मिळविले आहे.
कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार, 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्ती पत्रक. खोडवा उसासाठी राज्यात पहिला येण्याचा मान विलास सहकारी साखर कारखाना युनिट दोनचे ऊस उत्पादक शेतकरी बहादूर गुलाब शेख यांना मिळाला आहे. त्यांनी को 86032 या ऊस जातीचे हेक्टरी 275.40 टनाइतके उत्पादन घेतले आहे. याशिवाय अन्य पुरस्कारही घोषित करण्यात आले आहेत.
21 जानेवारी रोजी पुरस्कार वितरण
व्हीएसआयच्या मांजरी येथील मुख्यालयात 21 जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि सहकार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
यावेळी व्हीएसआयचे संचालक व विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.