‘व्हीएसआय’च्या पुरस्कार रकमांमध्ये घसघशीत वाढ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वैयक्तिक पुरस्कार आता १० हजारांऐवजी १ लाखाचे


पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात ‘व्हीएसआय’च्या पुरस्कारांच्या रकमांमध्ये घसघशीत वाढत करण्यात आली आहे. ‘वैयक्तिक पुरस्कार आता दहा हजारांऐवजी एक लाख रुपयांचे असतील’, अशी घोषणा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी केली.


विशेष म्हणजे पुरस्कारांची रक्कम वाढवा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली होती. त्यानंतर त्वरित खा. पवार यांनी पुरस्कारांच्या रक्कमा वाढवण्यात येत असल्याचे जाहीर केले.

‘व्हीएसआय’ची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि साखर हंगाम २०२३-२४ साठीच्या पुरस्कारांचे वितरण गुरुवारी संस्थेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहामध्ये झाले. यावेळी व्यासपीठावर खा. पवार, ना. अजितदादा यांच्याखेरीज सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, विजयसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब थोरात, सल्लागार शिवाजीराव देशमुख आदींची उपस्थिती होती.

संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संभाजी कडू पाटील यांनी सर्वसाधारण सभेचे विषय मांडले. ते सर्व आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांना, कारखान्याच्या चालकांना आणि संबधितांना काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधायला हरकत नाही. त्याचबरोबर संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी संस्था आणि सरकारमध्ये व्यवस्थित समन्वय असण्याची गरज आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते‌. आज दहा हजारला फारशी किंमत उरलेली नाही. त्यामुळे ती रक्कम एक लाख रुपये करण्याची मी विनंती करतो. अर्थात वाढ कधी करायची याचा निर्णय शरद पवार घेतील.

हाच धागा पकडून समारोपाच्या भाषणात खा. पवार म्हणाले की, आतापर्यंत वैयक्तिक कामगिरीबद्दल संस्थेकडून दिले जाणारे पुरस्कार दहा हजार रुपयांचे होते. आजपासून त्यांची रक्कम वाढवून एक लाख रूपये असेल. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराची रक्कम २ लाख ५१ हजार आहे. ती आजच्या सभेपासून पाच लाख रूपये असेल. यंदा हा पुरस्कार श्री अंबालिका साखर कारखान्याला देण्यात येत आहे, या कारखान्याला पाच लाखांचा पुरस्कार मिळेल.

सविस्तर वृत्त लवकरच, शुगरटुडे नियमित वाचा प्रिंट, ऑनलाइन

अजितदादा शरद पवारांच्या शेजारी बसणार होते, पण…
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं. आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्या बैठक व्यवस्थेत अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र, नंतर त्यांच्या जागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले. बारामतीत कृषी प्रदर्शनामध्ये देखील हे दोन्ही एकत्रित एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, त्यावेळी देखील शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले होते. आज या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या बाजूला बसण्याचे टाळले असल्याचे दिसले.


पुरस्कारांची सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »