आंतरराष्ट्रीय साखर परिषद पुढील वर्षी
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) च्या वतीने पुढील वर्षी जानेवारीत आंतरराष्ट्रीय साखर परिषद आयोजित केली जाणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
या निमित्ताने साखर प्रदर्शनदेखील होणार आहे, अशी माहिती व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील (आयएएस) यांनी दिली.
व्हीएसआयच्या वतीने दर चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. पहिली साखर परिषद २०१६ रोजी यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्यानंतर दुसरी साखर परिषद २०२० मध्ये झाली. आता तिसरी साखर परिषद ५ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान, व्हीएसआयच्या मांजरी (पुणे) येथील संकुलात होणार आहे.
यानिमित्ताने देशविदेशातील साखर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थांचा सहभाग असणारे प्रदर्शन अनुभवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील व्हीएसआयच्या उपकेंद्रांचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच खानदेशातदेखील व्हीएसआयचे उपकेंद्र सुरू होण्याची आम्हाला अपेक्षा आहे, असे कडू पाटील यांनी सांगितले.