‘शून्य टक्के मिल बंद तास’चा ध्यास धरा : आहेर

धाराशिव : ‘शून्य टक्के मिल बंद तास’ चे उद्दिष्ट साध्य करणे साखर कारखान्यासह सर्वांच्या भल्याचे आहे. म्हणून ‘शून्य टक्के मिल बंद तास’चा ध्यास धरा, असे मार्गदर्शन साखर उद्योगातील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र. आहेर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना (अरविंदनगर, केशेगाव, जि. धाराशिव) येथे आयोजित कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. “हायप्रेशर बॉयलरचे ऑपरेशन, मेंटेनन्स आणि सुरक्षितता” या विषयावरही श्री. आहेर यांनी व्याख्यान दिले.
साखर कारखान्याचे चेअरमन श्री. अरविंदराव गोरे यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक श्री. सूर्यकांत डाके , संचालक आणि जनरल मॅनेजर श्री. तानाजी गुंड यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेत, कारखान्याचे को-जन मॅनेजर श्री. के. आर. मोरे, डिस्टिलरी मॅनेजर आर. एम. सय्यद, डेप्यु चिफ केमिस्ट श्री. एस. एस. उमरदंड, इंजिनिअर, केमिस्ट आणि कारखाना कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

कारखान्याचे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. डाके यांनी प्रास्ताविक केले आणि श्री. आहेर यांचा परिचय करून दिला. श्री.आहेर यांचा चेअरमन श्री. अरविंदराव गोरे यांनी सत्कार केला.
या सत्रात आहेर यांनी ।।”एकच ध्यास, एकच ध्यास” ।। ।।”शून्य टक्के मिल बंद तास”।। या संकल्पनेचे महत्त्व विशद केले .
कारखाना सुरू असताना मिल बंद झाल्यावर कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान कसे होते हे त्यांनी आकडवारीनिशी पटवून दिले आणि “शून्य टक्के मिल बंद तास’ चे उद्दिष्ट कसे साध्य करायचे याची शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली.
या संकल्पनेमुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान टाळता येते. मिलचे रिझल्ट सुधारतात. वेळेची बचत होऊन उत्पादनात वाढ होते, असे त्यांनी सांगितले. दुसर्या सत्रात हाय प्रेशर बॉयलरची चालू असताना घ्यावयाची काळजी आणि ‘ऑफ सीझन’मध्ये करावयाचे मेंटेनन्स तसेच सुरक्षितताआणि शासकीय नियमांचे पालन या विषयावर शास्त्रीय पद्धतीने विवेचन करून काही टिप्स दिल्या.
बॉयलरचे डिझाईन, रचना, त्यासाठी वापरले जाणारे मटेरियल, फीड वॉटर केमिस्ट्री, पोलुशन नियंत्रण, बगॅस सेव्हिंग,वीज उत्पादन या विषयांवरील प्रश्नांची श्री. आहेर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे उपस्थितांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी जनरल मॅनेजर श्री. गुंड यांनी आभार मानले.