असं जगायचं राहून गेले

अस्मादिक आज्ञाधारक फार
कायम पहिला असा हुशार
होता गरीबीचा रोष अपार
उनाडक्या करणे राहून गेले ||१||
कॉलेजातही होतो शिस्तशीर
नव्हं तसा गबाळा बेफिकीर
होतो कायमच आटोपशीर
लाईन मारायचं राहून गेले||२||
नोकरीत नाही केला आराम
कामामध्येच सापडला राम
कायम मिळाला वाजवी दाम
चुगल्या करायचं राहुन गेले||३||
होईल तेवढी केली मदत
नाही काढली तयाची वरात
नियोजन शस्त्र होते हातात
कुचाळक्या करणे राहुन गेले||४||
वाणी सरळसोटच राहिली
भल्याची बु-याची पारख केली
सालस वृत्ती अंगी बाळगली
नथीतलेच तीर राहून गेले||५||
डोळस श्रद्धा देवाला वाहिली
मदिरालये नाही धुंडाळली
अबोलपणाची धग सोसली
भामटे वागायचे राहून गेले||६||
रचनाकार: आहेर वाळू रघुनाथ नाशिक. (बीई एमआयई बीओई)