वालचंदजी हिराचंद दोशी
आज शनिवार, नोव्हेंबर २३, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:५१ सूर्यास्त : १७:५९
चंद्रोदय : ०१:०३, नोव्हेंबर २४ चंद्रास्त : १३:१४
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
चंद्र माह : कार्तिक
आठवड्याचा दिवस शनिवार
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – १९:५६ पर्यंत
नक्षत्र : मघा – १९:२७ पर्यंत
योग : इन्द्र – ११:४२ पर्यंत
करण : बालव – ०६:५७ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – १९:५६ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : ०९:३८ ते ११:०१
गुलिक काल : ०६:५१ ते ०८:१४
यमगण्ड : १३:४८ ते १५:१२
अभिजितमुहूर्त : १२:०३ ते १२:४७
दुर्मुहूर्त : ०६:५१ ते ०७:३५
दुर्मुहूर्त : ०७:३५ ते ०८:२०
अमृत काल : १६:४९ ते १८:३५
वर्ज्य : ०४:२४, नोव्हेंबर २४ ते ०६:११, नोव्हेंबर २४
॥ देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् ।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ १॥
आज काल भैरव जयंती आहे.
उद्योगपती वालचंदजी हिराचंद दोशी – यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. बार्शी लाईट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले.
मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाटातले बोगदे, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.
ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय (ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली.
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्तान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
प्रीमिअर इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अॅक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार कंपनी, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.
१८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल , १९५३)
इतिहासकाळातील उपेक्षित पात्रांना न्याय देणारे लेखक – ना. सं. इनामदार
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर लिहीलेली ‘बंड’ ही त्यांची पहिली कादंबरी, परंतु ती प्रसिध्द होण्यास मात्र १९९६ साल उजाडले. त्या समराच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यानी ती लिहीली होती. झेप ही त्यांची प्रथम प्रसिध्द झालेली, दुसरी ऐतिहासिक कादंबरी, १९६३ सालामधे प्रकाशित झाली. ज्या काळात वाढते औद्योगिकीकरण, दाबले गेलेले कामगार, बदलणारे सामाजिक आणि व्यक्तिगत वास्तव यांचे पडसाद मराठी साहित्यसृष्टित उमटत होते, त्या काळात आपली आगळी वेगळी शैली घेऊन ना. सं. इनामदार आले आणि त्यांनी मराठी वाचकांना अक्षरश: जिंकून घेतले. इतिहास पुन्हा पुन्हा तपासण्याची ‘शिकस्त’ केली. त्यांची ही ‘झेप’ मराठी वाङमय जगताला एका नव्या क्षितिजाकडे नेणारी ठरली.
कथा लेखनाने त्याच्या लेखनाची सुरूवात झाली. इनामदारांनी आपले वाङमयीन लेखन १९४५ मध्ये ‘अनिल’ साप्ताहिकातून सुरू केले. १९५८ पर्यंत त्यांनी ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘किर्लोस्कर’, ‘साप्ताहिक स्वराज्य’ वगैरे नियतकालिकांतून लेखन केले. मराठेशाही आणि पेशवे यांच्या कालखंडातील अनेक व्यक्तींचा मागोवा त्यांनी घेतला. त्यांची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टि अतिशय निकोप होती. नोकरीच्या निमित्ताने हिंडत असताना ऐतिहासिक दस्तावेजांचे संशोधन करण्याचा छंदच त्यांना लागला होता.
त्रिंबकजी डेंगळे या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर त्यानी लिहीलेल्या ‘झेप’ या कादंबरीच्या एकंदर १० आवृत्त्या निघाल्या. या त्यांच्या कादंबरीस राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळाला.
त्यानंतर १९६६ साली आलेल्या त्यांच्या ‘झुंज’ या कादंबरीने पुन्हा एकवार राज्य शासनाचा पुरस्कार पटकाविला. मल्हारराव होळकर यांची सून अहिल्याबाई होळकर. त्यांच्या मुलाचे निधन झाल्यावर होळकर घराण्यातील तुकोजी होळकर याने सारी सुभेदारी सांभाळली. ‘यशवंतराव होळकर’ हे तुकोजी होळकरांचे अनौरस पुत्र. यशवंतराव होळकरांना पुणे जाळणारा पेशव्यांचा सरदार म्हणून सारेच ओळखतात. जुन्या मराठी माणसांनी प्रात:काळी ज्यांची नावे उच्चारू नयेत अशा त्रयीत यशवंतरावांची गणना केली. पण मराठी वाचकांना परिचित नसलेला यशवंतराव होळकर ‘झुंज’ मधे ना. सं. इनामदारांनी पेश केला आहे.
जदुनाथ सरकार यांच्या साहित्याने प्रेरित होऊन ना. सं. इनामदारांनी, ‘शहेनशहा’ ही कादंबरी लिहीली. पार्वतीबाईसाहेब पेशवे यांच्या जीवनावरील ‘शिकस्त’ मधे पानिपत युध्दात धारातिर्थी पडलेल्या सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नीच्या वेदना त्यांनी मांडल्या. ‘राऊ’ मधे, थोरल्या बाजीरावांचा पराक्रम, मस्तानी प्रकरण, या प्रकरणाचे बाजीरावांना बसलेले चटके, यांचा मागोवा घेतला आहे. दुसरा बाजीराव त्यांनी मंत्रावेगळा कादंबरीतून उभा केला. राजेश्री या कादंबरीमधे शिवचरित्राचा उत्तर भाग येतो.
झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त, राजेश्री, अशा त्यांच्या कादंब-यांनी तो काळ भारून टाकला होता. ही सारी निर्मिती १९६२ ते १९८६ या दोन तपांत झाली. त्यांची ‘घातचक्र’ ही कादंबरी देखील प्रकाशित झाली आहे. मंत्रावेगळा, झुंज आणि झेप या तिन्ही कादंब-यांना राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. १९९७ येथे झालेल्या नगर येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे ते तीन वर्ष उपाध्यक्ष होते.
१९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)
- घटना :
१९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
१९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
१९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
१९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
१९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान. - मृत्यू :
• १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर, १८५८)
• १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च , १८९१)
• १९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.
• २०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून१९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) - जन्म :
१८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)
१९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल, २०११)
१९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै, १९७२)