बड्या साखर कारखानदारांना पराभवाचा धक्का

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : साखर उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंतांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मातब्बर नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, मांजरा साखर परिवाराचे धीरज देशमुख, राधानगरीचे के. पी. पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सा. रे. पाटलांचे वारसदार गणपतराव पाटील, समरजितसिंह घाटगे, अशोकबापू पवार, संग्राम थोपटे, हर्षवर्धन पाटील आदी साखर उद्योगातील दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.

मात्र त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या साखर कारखानदारीत मोठा वाटा असणारे अजितदादा पवार, ‘भीमाशंकर’चे सर्वेसर्वा सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, ‘विठ्ठल’चे अभिजित पाटील, अमल महाडिक, राहुल कुल, राहुल आवाडे, विनय कोरे, रोहित पवार आदींनी विजयश्री मिळवली आहे.

यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत साखर उद्योगाशी संबंधित सुमारे ७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अधिपत्याखाली खासगी आणि सहकारी असे दोन्ही प्रकारचे साखर कारखाने आहेत. माळेगाव कारखान्याने सर्वाधिक दर देऊन, शेतकऱ्यांची मने जिंकली होती. अजित पवार स्वत: तर मोठ्या मताधिक्क्याने, म्हणजे सुमारे एक लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले होते.

अजितदादांना १ लाख ८१ हजार १३२ मते मिळाली, तरी युगेंद्र यांना ८० हजार २३३ मते मिळाली. याच मतदारसंघातून अभिजित बिचुकले हे पात्र उभे होते. त्यांना ९४ मते मिळाली.

विद्यमान सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघातून घासून विजयी झाले. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांचा सुमारे पंधराशेवर मतांनी पराभव केला. माजी सहकारमंत्री आणि शरद पवार यांच्या पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांचा कराड उत्तर मतदारसंघातून भाजपच्या मनोज घोरपडे यांनी ४३ हजार ६९१ मतांनी पराभव केला.
त्याचवेळी कराड दक्षिण मतदारसंघातून कृष्णा साखर कारखान्याचे सर्वेसर्वा सुरेश भोसले यांचे पुत्र, भाजप नेते डॉ. अतुलबाबा भोसले यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांचा ३९ हजार ३५५ मतांनी पराभव केला.

काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान औताडे यांच्यात अटीतटीची लढत झाली आणि त्यात औताडे यांनी भालकेंचा ८४३० मतांनी पराभव केला. याठिकाणी शरद पवारांच्या पक्षाचे अनिल सावंत उभे होते, त्यांना १०२१७ मते मिळाली.
इंदापूरमध्ये माजी मंत्री, राष्ट्रीय सह. साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा पराभवाचा धक्का बसला. हा त्यांचा सलग तिसरा पराभव आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत ऐनवेळी जाण्याचा धोका त्यांनी पत्करला होता. मात्र त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि अजितदादांच्या पक्षाचे शिलेदार दत्तामामा भरणे यांनी १९ हजार ४१० मतांनी पराभव केला. सोनई समूहाचे प्रवीण माने यांनी तब्बल ४० हजार मते घेत पाटलांच्या पराभवाला हातभार लावला.

कर्जत जामखेडमधून बारामती ॲग्रोचे संचालक रोहित पवार हे अत्यंत काठावर विजयी झाले. त्यांनी भाजपच्या राम शिंदे यांच्यावर अवघी १२४३ मतांची आघाडी घेतली. याच ठिकाणी आणखी एक रोहित पवार (अपक्ष) उभे होते, त्यांना ३४८९ मते मिळाली आहेत. तर या खेळीचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रवादी (शप)ने दोन राम शिंदे उभे केले होते. मात्र दोघांना मिळून पाचशे मतेदेखील मिळाली नाहीत.

काही विजयी साखर कारखानदारांची नावे
अजित पवार, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, राहुल आवाडे, अभिजित पाटील, अमल महाडिक, राहुल कुल, डॉ. विनय कोरे, रोहित पवार, विक्रम पाचपुते, सुरेश धस, संभाजी निलंगेकर, अभिमन्यू पवार, राणा जगजितसिंग पाटील, सुभाष देशमुख, समाधान औताडे, डॉ. अतुलबाबा भोसले, शिवेंद्रराजे भोसले, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, राहुल आवाडे, मोनिका राजळे, राहुल जगताप, मकरंद पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख इ.

काही पराभूत उमेदवार
बाळसाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, गणपतराव पाटील, युगेंद्र पवार (शरयू ॲग्रो), संग्राम थोपटे, ए.वाय. पाटील, समरजित घाटगे, प्रभाकर घार्गे, जयप्रकाश दांडेगावकर, राजेश टोपे इ.
(सविस्तर विश्लेषण लवकरच)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »