नियुक्तीच्या दिवशीच निरोप समारंभ
साखर आयुक्तालयातील सहसंचालकांच्या पदोन्नतीचा असाही गजब किस्सा
पुणे : साखर आयुक्तालयामधील एका नियुक्तीचा किस्सा सध्या खूपच गाजत आहे. स्वागत आणि निरोप समारंभ एकाच दिवशी पाहायला मिळण्याच्या दुर्मीळ सरकारी चमत्काराची जोरदार चर्चा आहे. सहसंचालक पदी नियुक्त झालेल्या एका अधिकाऱ्याला त्याच दिवशी, अवघ्या दोन तासांत भावपूर्ण निरोप देण्यात आला.
त्याचे झाले असे, की पांडुरंग शिगेदार हे कृषी अधिकारी पदोन्नत झाले आणि प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशन) साखर आयुक्त कार्यालयात ३१ मार्च रोजी सहसंचालकपदी नियुक्त झाले. ते कृषी विभागातून साखर संकुलात आले आणि त्यांनी सहसंचालकपदाचा पदभार स्वीकारला. मात्र ते रूजू होण्यापूर्वीच त्यांच्यासाठी निरोप समारंभाची तयारी सुरू करण्यात आली होती.
रूजू झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत शिगेदार यांना साखर संकुलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. शिगेदार यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी ३१ मार्च २०२३ रोजी पदोन्नती झाली आणि त्याच दिवशी त्यांना प्रतिनियुक्तीवर सहसंचालक म्हणून साखर संकुलात नियुक्ती देण्यात आली.
३१ मार्च रोजीच त्यांची सेवा संपून ते नियमानुसार निवृत्त होणार असल्याने त्यांची साखर संकुल ‘भेट’ अविस्मरणीय ठरली.
हे सहसंचालकपद (साखर विकास) अनेक दिवसांपासून रिक्तच आहे. ते अवघ्या काही तासांसाठी भरले गेले आणि पुन्हा रिक्त झाले.
आणखी गंमत अशी की, कृषी विभागात संपूर्ण कारकीर्द घालवलेल्या शिगेदार यांना शेवटचे काही तास प्रतिनियुक्तीवर साखर आयुक्तालयात काढावे लागले, त्यामुळे त्यांची सेवापुस्तिका आता साखर आयुक्तालयातूनच अंतिम होईल. निवृत्तीवेतनासह इतर बाबींची पूर्तता तेथून करावी लागेल, शासनाच्या ‘विलंबित खयाला’मुळे त्यांना विनाकारण मनस्ताप होऊ शकतो, अशी चर्चा होत आहे.