शेतकरी हिताचे व्रत कधीही सोडणार नाही : दिलीपराव देशमुख

रेणा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दहा टक्के बोनस जाहीर
लातूर : रेणा सहकारी साखर कारखान्याच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त १० टक्के बोनस जाहीर करून साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे हाती घेतलेले व्रत आम्ही कधीही सोडणार नसल्याचे प्रतिपादन रेणा साखर कारखान्याचे संस्थापक तथा मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले. अध्यक्षस्थानी चेअरमन अनंतराव देशमुख हे होते. यावेळी सर्वाधिक ऊस उत्पादक व पुरवठादारांचा सत्कार करण्यात आला तसेच स्पर्धा परीक्षा केंद्राचा लाभ घेवून शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभासाठी आम्ही कटिबद्ध
दिलीपराव देशमुख म्हणाले, लोकनेते विलासराव देशमुख यांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाला पाठबळ दिले. लातूर जिल्ह्यात केवळ दोन कारखाने होते आता दहा साखर कारखाने आहेत. उसाला चांगला भाव मिळत असल्याने उसाचे क्षेत्र वाढत आहे. गाळपास आलेल्या उसाला ३१५० रूपयेच्या आसपास दर देऊ. आपल्या भागातील साखर कारखानदारी योग्य प्रकारे चालवून त्याचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळवून देता येईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
धीरज देशमुख म्हणाले, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा असते. या कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्राचा पॅटर्न निर्माण केला आहे. या माध्यमातून जवळपास आठ हजार लोकांना त्यांच्या हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे कार्य उत्तमपणे चालू असून यामुळे शासकीय सेवेत अनेक विद्यार्थी रुजू झाले आहेत. खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांनी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नियोजनातून नावारूपाला आलेली मांजरा परिवारातील साखर कारखानदारी हे आपले भूषण असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी केले. संचालक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आभार मानले.