आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणणार- राजू शेट्टी 

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : ऊसतोडीनंतर पंधरा दिवसांत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांना आयुक्तांना भेटून आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खमकी माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी स्वाभिमानी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा येथे शासकीय विश्रामगृहात, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.

 यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस पडला. हा पैसा संबंधित नेत्यांनी रोजगार हमीवर जाऊन मिळवला नाही. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला काळा पैसाच निवडणुकीत बाहेर येतो. आम्हाला या साठमारीत पडायचे नाही. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे पावित्र  डागाळायचे नाही. मात्र, आज स्थानिक स्वराज्य संस्था कोणासाठी आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजकारणात काळ्या पैशांचा अमर्याद वापर वाढला आहे. काळ्या पैशांपाठोपाठ गुंडागर्दी येते. एका हातात दंडुका आणि एका हातात नोटांची थप्प्या घेऊन निवडणुका मॅनेज होत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेण्याची गरज आहे. हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे. त्यांनी चोरांच्या पायात पत्र्या ठोकल्या. आज पत्र्या ठोकण्याची गरज नाही, सातारकरांनी मतपेटीतून त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »