ऊसतोड पैशाच्या वादातून महिलेचा खून; आरोपी अटकेत

जालना : भोकरदन तालुक्यातील खडकी येथे शनिवारी (दि.६) ऊसतोडीच्या पैशाच्या वादातून एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. उषाबाई भास्कर सदाशिवे (वय ४०, रा. खडकी, ता. भोकरदन जि. जालना), असे मृत महिलेचे नाव आहे. शरद शिवाजी राऊत (रा.चांधई टेपले, ता.भोकरदन जि. जालना) असे संशयित आरोपीचे नाव आहे. हसनाबाद पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत आरोपीस अटक केली आहे.
हसनाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा शरद राऊत ऊसतोड मुकादम आहे. तो कारखान्यांना कोयता (उसतोड मजूर) पुरवण्याचे काम करतो. शरद राऊत याने खडकी येथील उषाबाई सदाशिवे यांना ऊसतोडीला येण्यासाठी पैसे दिले होते. त्यानंतर त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या देवाण-घेवाणीचा वाद सुरू होता. दरम्यान, आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास शरद राऊत याने उषाबाई यांना जवखेडा शिवारात बोलावून घेतले. तेथील एका कपाशीच्या शेतात दोघांमध्ये पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाल्याने रागाच्या भरात शरद राऊत याने उषाबाई यांच्याच स्कॉर्पने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह जागेवर सोडून तो घरी परतला.
दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. त्यानंतर तपासाला सुरुवात केली. चौकशीत पोलिसांना उषाबाई व शरद राऊत यांचा पैशाचा वाद सुरू होता, अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी राऊत याचा मोबाईल क्रमांक मिळवला. टॉवर लोकेशनच्या आधारे तो जावळेवाडी शिवारातील शेतात असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ आरोपीच्या शेतातील घरात जाऊन शरद राऊत यास ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणी मृत उषाबाई यांचा मुलगा संतोष भास्कर सदाशिवे याच्या फिर्यादीवरून हसनाबाद ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






