ऊसतोडणी प्रश्नावर बुधवारी पुण्यात व्यापक विचारमंथन
पुणे : ‘ऊस तोडणी समस्या व त्यावर उपाय’ यावर बुधवारी (१७ मे) पुण्यात व्यापक विचारमंथन होणार आहे. त्यासाठी कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, नामवंत तज्ज्ञ त्यात सहभागी होत आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा येथील साखर कारखान्यासाठी ही कार्यशाळा डीएसटीएआय या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला सर्व संबंधितांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन डीएसटीएआय, साखर आयुक्तालय आणि आयोजकांनी केले आहे.
मागील ३-४ वर्षापासून साखर कारखान्यांमध्ये मजुरांच्या समस्येमुळे ऊस तोडणी वेळेवर होत नाही किंवा शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून यांत्रिकीकरण आणि ऊस तोडणी मशीनच्या सहाय्याने करण्याकडे कारखान्यांचा कल वाढत आहे.
ऊस तोडणी मशीन मुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर तोडला जात आहे; तसेच पाचटापासून जमिनीत सेंद्रिय खत उपलब्ध होऊन जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत होत आहे.
मशीनच्या सहाय्याने ऊस तोडणी करत असताना येणाऱ्या समस्या त्यावर उपाय आणि पुढील वाटचाल यावर, शिवाजीनगर (पुणे) येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन (इंडिया)(डीएसटीएआय) मार्फत ४ राज्यातील साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनातील प्रमुख आणि वरिष्ठ जसे चेअरमन, संचालक, कार्यकारी संचालक, शेती अधिकारी ऊस विकास अधिकारी, ऊस तोडणी मशीन कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी ही कार्यशाळा आहे. ती सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत होईल.
या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे अभ्यासू साखर आयुक्त माननीय शेखर गायकवाड उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीएसटीएचे प्रमुख शहाजीराव भड असतील, तर प्रमुख उपस्थितांमध्ये ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, तसेच कार्यकारी संचालक अजित चौगुले, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ हेही मार्गदर्शन करणार आहेत.
नामवंतांचे मार्गदर्शन
या कार्यक्रमांमध्ये कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, अभ्यासू शेतकरी कृषीरत्न डॉ. संजीव माने, माजी ऊस विशेषज्ञ आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, वरिष्ठ प्राध्यापक आणि प्राचार्य डॉ. दशरथ ठवाळ, उगार शुगर चे डॉ. जगदीश कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.
यांत्रिक तोडणी प्राधान्याने केलेले साखर कारखान्यातील प्रतिनिधी त्यांचे अनुभव विशद करणार आहेत. या परिषदेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ऊस तोडणी मशीन विकसित केलेल्या व सध्या कारखान्यात प्राधान्याने वापरणाऱ्या कंपन्यांचे जसे शक्तिमान, न्यू हॉलंड, एसबी रिसेलर- कोल्हापूर या कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांचे अनुभव व ऊस तोडणी साठी पुढील वाटचाल या विषयावर त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत.
तसेच या कंपन्यानी त्यांचे मशीन व संबंधित यंत्र-अवजारांचे प्रदर्शनही कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजित केले आहे.
या सुवर्णसंधीचा साखर कारखाने आणि संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डीएसटीएआयचे अध्यक्ष शहाजीराव भड, कृषी विभागाचे समन्वयक डॉ. संजीव माने आणि डॉ. सुरेश पवार यांनी केले आहे.