आगामी हंगामात १३४३ लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणेः येणाऱ्या हंगामात साखर कारखान्यांना गाळपासाठी एकूण १३४३ लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाज आहे. राज्यात येत्या ऊस गाळप हंगामासाठी उपलब्ध होणाऱ्या उसाचा पहिला अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केला आहे.

शेखर गायकवाड,
साखर आयुक्त

साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अभ्यासातून उत्पादनाचे पहिले अंदाज हाती आलेले आहेत. कृषी विभाग व राज्यातील सर्व खासगी व सहकारी साखर कारखान्यांसोबत झालेल्या बैठका, राज्यातील खोडव्याची उपलब्धता व नवी लागवड तसेच मॉन्सूनची वाटचाल या सर्व मुद्द्यांचा आढावा घेतल्यानंतर अंदाज काढण्यात आलेला आहे.

२०२१-२२ मध्ये राज्यात विक्रमी १४,८७,८३६ हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. यंदा (हंगाम २०२२-२३) लागवडीत किंचित वाढ झाली असून, एकूण १४,८८,७७० हेक्टरवर ऊस उपलब्ध असेल, असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे.

यंदा उसाची उपलब्धता सरासरी हेक्टरी ९५ टनांपर्यंत असेल. त्यातून १४१३ लाख टन ऊस तयार होईल, असे अंदाज अहवालातून स्पष्ट होते आहे. लागवड झालेला सर्व ऊस मात्र साखर कारखान्यांना उपलब्ध होत नाही. जनावरांसाठी चारा, गूळ उद्योग आणि रसवंतीसाठी ५-७ टक्के ऊस वापरला जातो. त्यामुळे परिपक्व उसापैकी कारखान्यांना अंदाजे एकूण १३४३ लाख टन ऊस मिळण्याची शक्यता आहे.
आगामी गाळप हंगामासाठी राज्याचा साखर उतारा ११.२० टक्के गृहीत धरण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूण १५० लाख टन साखर तयार करण्याची क्षमता राज्याची असेल. परंतु साखरनिर्मितीला मर्यादित ठेवत इथेनॉल तयार करण्याकरिता राज्यातील कारखाने यंदाही तयारी करीत आहेत. परिणामी, किमान १२ लाख टन साखर यंदा इथेनॉलकडे वळविली जाईल, असा साखर आयुक्तालायचा अंदाज आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »